हुबळी एक्स्प्रेसला जेजुरी स्थानकात थांबा द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 02:29 PM2020-02-08T14:29:53+5:302020-02-08T14:37:08+5:30
जेजुरी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून तेथे खंडेरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राबाहेरूनही भाविक येतात. जेजुरी व नीरा स्थानकातून दिवसा मुंबईकडे जाणारी व येणारी कोयना एक्स्प्रेस चार महिन्यांपासून बंद
जेजुरी : लोकमान्य टर्मिनस ते हुबळी एक्स्प्रेस रेल्वेगाडीलाजेजुरीरेल्वे स्थानकात एक मिनिटाचा थांबा मिळावा, अशी मागणी जेजुरी ग्रामस्थ व प्रवाशांकडून रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल हे आज जेजुरीला रेल्वे स्थानकाच्या पाहणीसाठी आले होते. स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या वतीने राजू पानसरे यांनी या मागणीचे निवेदन त्यांना दिले. त्याचबरोबर जेजुरी व नीरा स्थानकातून दिवसा मुंबईकडे जाणारी व येणारी कोयना एक्स्प्रेस चार महिन्यांपासून बंद आहे. मुंबईकर चाकरमान्यांना ही गाडी सोयीची आहे. त्याचबरोबर सातारा व कोल्हापूर पॅसेंजर या वेळेवर धावत नाहीत. प्रवाशांना त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतोच; शिवाय पाच पट खर्चही करावा लागत असल्याने या गाड्या नियमित व वेळेवर धावाव्यात, अशी मागणीही या वेळी जेजुरी व नीरा येथील रेल्वे प्रवाशांकडून करण्यात आली आहे.
जेजुरी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून तेथे खंडेरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राबाहेरूनही भाविक येतात. यात आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून येणाऱ्या भाविकांची संख्या ही मोठी आहे.
हुबळी एक्स्प्रेस ही गाडी बाहेरून येथे देवदर्शनासाठी येण्यासाठी सोयीची असल्याने नेहमीच लोकमान्य टर्मिनस ते हुबळी एक्स्प्रेस येथे थांबल्यास सोयीचे होणार आहे. ती जेजुरी रेल्वे स्थानकात एक मिनिट थांबवली जावी, अशी मागणी नेहमी भाविकांकडून केली जात आहे.