दिवाळी अगोदरच दिवाळे निघेल; खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी सर्वसामान्यांची लूट थांबवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 05:09 PM2022-10-14T17:09:22+5:302022-10-14T17:09:45+5:30

युवक काँग्रेसच्या वतीने आरटीओ अधिकाऱ्यांकडे मागणी ; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Stop looting of common people by private travels | दिवाळी अगोदरच दिवाळे निघेल; खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी सर्वसामान्यांची लूट थांबवा

दिवाळी अगोदरच दिवाळे निघेल; खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी सर्वसामान्यांची लूट थांबवा

Next

पुणे : खासगी वाहतूक बस, ट्रॅव्हल्सकडून सणाच्या काळात अवास्तव प्रवास भाडे आकारून होणारी आर्थिक लूट त्वरित थांबवावी, अशी मागणी प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांना बेकायदा तिकिट आकारणी विरोधात कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला. प्रदेश युवक
काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी निवेदन दिले. यावेळी राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या महासचिव वैष्णवी किराड, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन, आनंद दुबे, पुणे शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ अमराळे, पुणे सरचिटणीस पूनमित तिवारी, पुणे सरचिटणीस हृषीकेश सणस, पर्वती विधानसभा अध्यक्ष केतन जाधव यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

याबाबत बोलताना प्रथमेश आबनावे म्हणाले की, दिवाळीच्या निमित्ताने पुण्यातून बाहेरगावी खासगी बस आणि ट्रॅव्हल्स तर्फे जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यात विद्यार्थी आणि नोकरदारांचे प्रमाण लक्षणीय आहे.सणाच्या तोंडावर केलेली ही भरमसाठ भाडेवाढ यामुळे दिवाळी साजरी करण्याआधीच दिवाळे निघेल, अशी परिस्थिती आहे. अशाने अराजकता माजेल. तसेच खासगी वाहने आणि ट्रॅव्हल्ससाठी भाडे निश्चिती मोटार अॅक्टनुसार करण्यात आली असून, ती एसटी भाड्यापेक्षा ५० टक्के अधिक आहे. म्हणजेच एसटीचे भाडे २०० असेल, तर खाजगी
बस चालकांना तीनशे रुपये तिकीट घेता येते. त्यामुळे वेळीच प्रशासनाने यात लक्ष घालावे आणि अकारण भाडेवाढ करून प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्यांवर कारवाई करावी. प्रशासनाने संबंधितांवर योग्य वेळेत कारवाई केली नाही तर १८ ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही आबनावे यांनी दिला.

युवक काँग्रेसच्या मागण्या..

- ज्यादा भाडे आकारणी करणाऱ्या बस चालकांची नोंदणी रद्द करा.
- नियमानुसार भाडे आकारणी दरपत्रकाची जागृती करणारे फलक लावा.
- तक्रार आल्यास शहानिशा करून प्रवाशाला २४ तासात न्याय द्या.
- पथक तयार करून भाडे आकारणीतील अनियमितता तपासा.
- अवास्तव भाडे आकारणाऱ्या बस, ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करा.

 

 

Web Title: Stop looting of common people by private travels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.