आता बास! पुण्यात 'विकेंड लॉकडाऊन' असताना नागरिकांची रस्त्यावर गर्दी , पुणे पोलीस सह आयुक्त म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 04:50 PM2021-04-17T16:50:44+5:302021-04-17T16:56:17+5:30
कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचे भान बाळगा, अन्यथा कारवाई अटळ
पुणे : पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शुक्रवारी रात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत कडक विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मागील विकेंड लॉकडाऊनला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, आज पुण्यात घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा पोलिसांकडून वाहनजप्ती, दंडात्मक, तसेच कायदेशीर कारवाई करण्याची करण्यात येईल अशी माहिती पुणे पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.
याबाबत डॉ. शिसवे म्हणाले, पुण्यात कोरोना ग्रस्तांची संख्या सातत्याने वाढते आहे. या कठीण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर कर्तव्य बजावत आहे.नागरिकांनी या गोष्टीचे भान जपत त्यांना सहकार्य करावे. तसेच अत्यावश्यक कारणांसाठीच विकेंड काळात घराबाहेर पडावे.आणि घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींकडे चौकशी करण्याचा व ओळखपत्र मागण्याचा पोलिसांना अधिकार असून ती त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र, या चौकशीत जर तुम्हाला आदेशात नमूद केल्याप्रमाणे वैध कारण देता आले नाही तर कारवाई करण्यात येणार आहे.
शहरात विकेंड लॉकडाऊनला सर्व आस्थापना बंद आहे. परंतू,तरीदेखील नागरिकांचे घराबाहेर पडण्याचे प्रमाण आज काहीसे जास्त आहे.ही चिंताजनक बाब असुन नागरिकांनी परिस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे.आमचे धोरण हे नागरिकांवर कारवाई करण्याचे नसून नियमांचे पालन करावे.जसे गणेशोत्सव, डिसेंबर महिना तसेच मागील दोन विकेंड लॉकडाऊनमध्ये जसे सहकार्य केले तेच आत्ताही अपेक्षित आहे. विनाकारण घराबाहेर पडत कारवाईची करण्याची वेळ पोलिसांवर आणू नये.
सध्या शहरातील ९६ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. विनाकारण फिरणार्यांवर कारवाई करण्यात येत आहे. विकेन्ड काळात अत्यावश्यक सेवा म्हणजेच मेडिकल, दवाखाने, लॅब या यांनाच फक्त परवानगी आहे. दूधविक्रेते, सकाळी ११ पर्यंत परवानगी सोडता भाजीपाला, किराणा दुकाने हे सुद्धा पूर्णपणे बंद ठेवणे अपेक्षित आहे. त्यामुळे लोकांना आता बाहेर पडण्याचे काम राहणार नाही.
...........
नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची आवश्यकता आहे. त्यानुसार महापालिकेने आवश्यक त्या उपाययोजना आखल्या असून पोलीस संचारबंदीची अंमलबजावणी करणार आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करुन कारवाईची वेळ आणू नये.
डॉ. रवींद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त, पुणे.