पुणे-सातारा महामार्गावर रास्ता रोको
By admin | Published: March 27, 2017 02:01 AM2017-03-27T02:01:43+5:302017-03-27T02:01:43+5:30
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी. शेतमालाला हमीभाव द्यावा, या मागणीसाठी कॉँग्रेसचे भोर, वेल्हा व मुळशीचे
नसरापूर : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी. शेतमालाला हमीभाव द्यावा, या मागणीसाठी कॉँग्रेसचे भोर, वेल्हा व मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्यासह १९ आमदारांनी विधिमंडळात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केल्यामुळे त्यांचे ३१ डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात आले होते. याकरिता आज नसरापूर येथील चेलाडी फाटा येथे भाजपा सरकारचा निषेध करीत पुणे-सातारा महामार्ग रोखण्यात आला. या रास्ता रोकोच्या वेळी महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा
लागल्या होत्या.
नसरापूर येथील चेलाडी फाटा येथे काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सकाळी ११:३० वाजता सुमारे १० मिनिटे महामार्ग रोखला. या वेळी पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांच्यासह भोर तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, काँग्रेसचे जि. प. गटनेते विठ्ठल आवाळे, दिलीप बाठे, उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, वेल्हा तालुकाध्यक्ष नाना राऊत, सोपान म्हस्के, रोहन बाठे, गीतांजली शेटे, आशाताई रेणुसे, दिनकर धरपाळे, पोपटराव सुके, संतोष सोंडकर, मदन खुटवड, बाबू झोरे, अरविंद सोंडकर, संदीप चक्के, दत्ता बाठे, महेश टापरे, आकाश वाडघरे, सुभाष कोंढाळकर, इरफान मुलाणी उपस्थित होते.
या वेळी आमदार कारवाईच्या निषेधार्थ भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या वेळी जिल्हाध्यक्ष संजय जगताप, शैलेश सोनवणे आदींनी आमदार संग्राम थोपटे यांच्यासह सर्व आमदारांचे निलंबन सरकारने मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन भोरच्या तहसीलदार वर्षा शिंगण-पाटील व राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
कर्जमाफी घोषणा न झाल्यानेच आंदोलन
आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिििनधींना बेकायशीरपणे निलंबित करून शेतकरीबांधवांचा व लोकप्रतिनिधींचा आवाज ठोकशाहीने चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा भोर, वेल्हा व मुळशी तालुका काँग्रेस व शेतकऱ्यांच्या वतीने जोरदार निषेध नोंदवून निलंबन रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
निलंबनाची कारवाई रद्द न झाल्यास आणि अजूनही कर्जमाफी घोषणा न झाल्यानेच नसरापूर येथील चेलाडी फाटा येथे आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांशी सरकारचा कृतघ्नपणा : प्रवीण माने
इंदापूर : शेतकरी हा लोकजीवनाचा केंद्रबिंदू आहे. त्याचे जगणे सुसह्य होण्यासाठी कर्जमाफीसारख्या सवलती त्याला मिळाल्याच पाहिजेत. मात्र, त्या न देता, तशी मागणी करणाऱ्या दत्तात्रय भरणे व इतर लोकप्रतिनिधींना निलंबित करून राज्यातील भाजप सरकार शेतकऱ्यांशी, इथल्या मातीशी कृतघ्नपणा करत आहे, अशी टीका जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी वरकुटे बुद्रुक येथे बोलताना केली.
एका खासगी उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. माने म्हणाले की, आमदार निलंबनाचे परिणाम भाजप सरकारला भोगावे लागतील. सध्या सोलापूरसाठी नदीतून व सिनामाढा बोगद्यातून उजनी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. उजनी धरण झपाट्याने खाली होत आहे. त्याबाबत सरकारने इंदापूरकराचा विचार करावा. त्यांचे हक्काचे पाणी आरक्षित करावे, अशी मागणी त्यांनी केली. सूरज शिंदे, राजेंद्र गोलांडे, आबा करे, भाऊ देवकर, दादा कुंभार, पप्पू घोडके, तुषार पाटील, हरिश्चंद्र देवकर आदी उपस्थित होते.