आपापसांतील भांडाभांड बंद करा; चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 10:24 AM2022-10-07T10:24:35+5:302022-10-07T10:24:41+5:30
शंभर नगरसेवक आले तरच पुणे महापालिका आपल्या ताब्यात
पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शंभर नगरसेवक निवडून आले तरच, भाजपने पुणे महापालिका जिंकली असे मी मानेन. ९९ नगरसेवक आल्यावर महापौर आपला होईल; पण भाजपने महापालिका जिंकली असे मी कधीच म्हणणार नाही. त्यामुळे आपापसांतील भांडाभांड बंद करा, अशा स्पष्ट शब्दांत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले.
चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर, शहर भाजपच्या वतीने गुरुवारी पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी अशा प्रकारच्या समारंभात वेळही जातो व पैसाही खर्च होतो, या मताचा मी आहे, असे सांगितले. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा सत्कार कार्यक्रम संघटनात्मक बांधणीसाठी बळ देईल; त्यासाठीच मी या कार्यक्रमाचा स्वीकार केला असेही त्यांनी नमूद केले.
पाटील म्हणाले, गेल्या अडीच वर्षांत भाजपच्या कार्यकर्त्यांना सत्ताधाऱ्यांनी मोठा त्रास दिला. तरीही भाजपचे कार्यकर्ते टिकून राहिले. फडणवीस सरकारचे निर्णय रद्द करणे व खुन्नस काढणे एवढेच काम त्यांनी केले. परंतु, या काळात हे सरकार कसे जाईल असे आमचे नियोजन चालूच होते व शेवटी ते खरे झालेच. आता पुढील काळात खूप मोठी आव्हाने पेलावी लागणार असून, शहरातील रस्त्यांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, जायका प्रकल्प पूर्ण करणे, रिंग रोड, मेट्रो, आदी कामांसाठी अठरा-वीस तास कामाची तयारी सर्वांनीच ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
बाहेरचा आला म्हणून हिणवले; पण फरक नाही
कोल्हापूरहून येऊन पुण्यात कोथरूडमधून निवडणूक लढवून लाखो मतांचा मेवा मिळविला, असा आरोप करीत मला बाहेरचा म्हणून बाेलतात. याबाबत अनेकांनी मला विचारले की, तुमच्या मनात याची खदखद आहे का? परंतु, मी याकडे अधिक लक्ष देत नाही. मी याच्याकडे एक खेळ म्हणून पाहतो, असे स्पष्ट करीत पाटील यांनी, मी वरिष्ठांच्या आदेशानुसार पुणे व परिसर जिंकण्याचे टार्गेट घेऊन येथे आलाे असल्याचे सांगितले.