अन्नासाठी बिबट्याचा शहराभोवती ‘रास्ता रोको’; त्यांचेही प्रश्न सोडवायला हवेत !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 06:21 PM2020-10-12T18:21:11+5:302020-10-12T18:30:52+5:30
झळ लागली की माणसे जशी ‘रास्ता रोको’ करतात अगदी तसे ते देखील पुण्याभोवती येत आहेत..
श्रीकिशन काळे -
पुणे : शहराभोवती बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असून, तो दिवसासुध्दा भक्ष्याच्या शोधात फिरत आहे. अशा वेळी माणसांशी संघर्ष अटळ आहे. त्याच्या पोटातली भूक, पिल्लांची चिंता बिबट्याला गप्प बसू देत नाही. परिणामी तो अन्नासाठी भटकंती करत आहे. खरंतर बिबट्यांचेही काही प्रश्न आहेत. ते सोडवणे आवश्यक असून, म्हणून बिबटेही जणूकाही आता शहराभोवतीच्या रस्त्यावर उतरले आहेत. झळ लागली की माणसे जशी ‘रास्ता रोको’ करतात अगदी तसे ते देखील पुण्याभोवती येत आहेत.
बिबट्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. पूर्वी गावालगत घनदाट जंगले होते. त्यात ते सुखरूप राहत. पण नंतर घनदाट जंगल कमी झाले आणि बिबटे अन्नासाठी गावात येऊ लागले. त्यांचा अधिवास सोडून ते उसाच्या शेतात राहत आहेत. उसातील बिबट्याचे वर्तन तपासले पाहिजे. संशोधन, निरीक्षण व्हायला हवे. तरच त्यावर उपाययोजना करता येतील, असे माजी साहय्यक वनसंरक्षक प्रभाकर कुकडोलकर यांनी सांगितले.
बिबट्यालाही निवांत झोपायचेय...
शहराभोवती, गावांत अस्वच्छतेमुळे कुत्री, डुक्करांची संख्या वाढते. त्यामुळे बिबटे तिथे फिरकतात. आपल्याला निवांत झोपायचे असेल, तर बिबट्याच्या अंगावरही मायेचे, उबदार असे अभयारण्याचे वस्त्र घालावेच लागेल, असे कुकडोलकर म्हणाले.
.........................................
वन्य प्राण्यांची प्रजोत्पादन केंद्रे सुरू व्हावी
बिबट्याला त्याचे नैसर्गिक भक्ष्य सहजपणे उपलब्ध व्हायला हवे. त्यासाठी अभयारण्यांच्या क्षेत्रातच वन्य प्राण्यांची प्रजोत्पादन केंद्रे हवीत. अशा केंद्रांमध्ये सांबर, चितळ, भोकर अशा हरणांची पैदास करता येईल व त्यांना जंगलात सोडता येईल. अन्न, पाणी, निवारा, संरक्षण आणि जोडीदार हे बिबट्याचे आवश्यक घटक आहेत. ते त्यांना मिळाले, तर त्यांचे संवर्धन होईल, असे माजी वन अधिकारी प्रभाकर कुकडोलकर यांनी सांगितले.
..........
‘कॉलर’मुळे बिबट्याला समजून घेता येईल...
सध्या जुन्नर परिसरातील बिबट्यांना कॉलर लावणार आहेत. कॉलरमुळे बिबट्याचा वावर समजेल, तो कुठं जातो, कसे वर्तन करतो याचे संशोधन करून त्यातून निष्कर्ष काढता येतील, असे कुकडोलकर यांनी सांगितले.
................
रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर
गेल्या काही वर्षांपासून मिहिर गोडबोले यांनी सुरू केलेली ‘ग्रासलॅँड’ संस्था कोल्हे, लांडगे या प्राण्यांसाठी काम करीत आहे. त्यांचा अधिवास कायम राहावा, यासाठी प्रयत्न केला जात आहे. तसेच त्यांचा अभ्यासही केला जात आहे. दिवे घाट, कात्रज घाट परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. नुकताच त्यांनी रात्री शहर आणि बिबट्याने पकडलेले भक्ष्य असा एक फोटो मिळवला आहे. त्यावरून बिबट्या आता अन्नासाठी शहराभोवती फिरत असून, तो देखील त्याच्या प्रश्नांसाठी जणूकाही रस्त्यावरच आलेला दिसत आहे.