उजनीच्या पाणी प्रश्नावरून इंदापूरात शेतकरी रस्त्यावर, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 04:25 PM2021-05-27T16:25:36+5:302021-05-27T16:34:31+5:30
"कोण म्हणत पाणी देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही" अशी भुमीका घेत केला सोलापूरच्या नेत्यांचा निषेध
बाभुळगाव: उजनीचा पाणी प्रश्न गेल्या महिन्यापासून मिटायचे नाव घेत नाही. त्यामुळे इंदापूर व सोलापूर मधील शेतकर्यांमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर इंदापूर शेतकऱ्यांनी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आहे
"कोण म्हणत पाणी देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही" अशी भुमीका घेत सरडेवाडी येथील पूणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेतकरी कती संघर्ष समीतीच्या शेतकर्यांनी सोलापूरच्या नेत्यांचा निषेध नोंदवला आहे.
वाटेल ती किंमत मोजू पण पंधरा दिवसात इंदापूर तालुक्याला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील २२ गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. परंतु सोलापूर जिल्ह्यातून इंदापूरच्या पाच टीएमसी पाण्याला विरोध झाला. त्यामुळे शासनाला पाणी वाटपाचा आदेश रद्द करावा लागला. पाण्यासाठी विरोध करणार्यांना भविष्यात इंदापूर तालुक्यातील शेतकरी जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. असेही समितीने सांगितले.
पाणी प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घाई गडबडीत घेतलेल्या निर्णयाचा फेर विचार करावा. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न मिटणार आहे. उजनी धरणाची निर्मिती होताना इंदापूर तालुक्यातील शेकडो शेतकर्यांनी आपल्या हजारो एकर शेत जमीनींचा त्याग केला आहे. पालकमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात फीरकु न देण्याची भाषा सोलापूरातील काही नेतेमंडळी करत आहेत. परंतु तसे घडल्यास इंदापूर तालुक्यातील शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील एकाही नेत्याची गाडी भिमानगर पुलाच्या अलीकडे येऊ न देता, जशास तसे उत्तर दिले जाईल. असे इंदापूर तालुका शेतकरी संघर्ष कृती समीतीकडून सुचित करण्यात आल्याने पाणी प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.