खंडित वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ रास्ता रोको

By admin | Published: May 27, 2017 01:12 AM2017-05-27T01:12:02+5:302017-05-27T01:12:02+5:30

वारंवार खंडित होणाऱ्या विद्युतपुरावठ्याला नागरिक संतापले होते. मात्र, गुरुवारी चिंचवडमधील बहुतांशी भागात

Stop the road to protest the disrupted power supply | खंडित वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ रास्ता रोको

खंडित वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ रास्ता रोको

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचवड : वारंवार खंडित होणाऱ्या विद्युतपुरावठ्याला नागरिक संतापले होते. मात्र, गुरुवारी चिंचवडमधील बहुतांशी भागात सकाळी दहापासून लाईट नव्हती. मात्र, सायंकाळी पाच नंतरही येथील समस्या सुटत नसल्याने नागरिक संतप्त झाले. अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने नागरिकांचा उद्रेक होत गेला. प्रेमलोक पार्क परिसरात ‘रास्ता रोको’ करून संताप व्यक्त केला.
अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय कामामुळे २६ तास वीजपुरवठा खंडित राहिला. तर अनेक भागात पाण्याचे हाल झाले. गुरुवारी सकाळपासून चिंचवडमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. प्रेमलोक पार्क, इंदिरानगर, दळवीनगर, उद्योगनगर भागात महावितरणचे कर्मचारी काम करत होते. सायंकाळी चार वाजता या परिसरातील विविध ट्रान्सफॉर्मवर स्फोट झाले. काही ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवित या आगीवर माती टाकून आग आटोक्यात आणली. काही ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. याबाबत महावितरणचे उपअभियंता संतोष झोडगे यांना अनेकांनी फोन करून घटनेची माहिती दिली.
लाईट केव्हा येणार यासाठी अनेक जण कार्यालयात फोन करत होते. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे नागरिक संतप्त झाले होते. सहा वाजता स्थानिक नगरसेवकांनी या विषयी अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. काम सुरू असल्याने दहा मिनिटांत आम्ही विद्युतपुरवठा सुरू करत असल्याचे सांगण्यात आले. काही वेळातच इंदिरानगर भागात पुन्हा मोठा स्फोट झाला. यामुळे भयभीत होऊन
अनेक नागरिक रस्त्यावर जमा झाले. या वेळी कर्मचाऱ्यांनी नक्की कोठे अडचण आहे, हे आम्ही तपासत असल्याचे सांगितले. रात्री दहापर्यंत अधिकारी कोणतेही समाधानकारक उत्तर देत नसल्याने नागरिकांनी त्यांना जाब विचारला. या वेळी शाब्दिक चकमक झाली.
प्रेमलोक पार्क परिसरात संतप्त नागरिकांचा जमाव जमा झाला. या जमावाने चिंचवडगावाकडून आकुर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने आडवी लावून रस्त्यावर ठिय्या मांडला. काही क्षणातच दोन्ही बाजूने रास्ता रोको करण्यात आला. विद्युतपुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत वाहतूक सुरू होणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
नगरसेविका माधुरी कुलकर्णी, नामदेव ढाके, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे यांनी नागरिकांची समजूत काढत रस्ता मोकळा करण्यास सांगितले. महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी एस. व्ही. दिवाकर यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. मात्र, त्यांनीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. रात्री बारा वाजता कर्मचारी व अधिकारी परिसरात येऊन काम करत होते. या वेळी संतप्त नागरिकांनी झोडगे यांना धारेवर धरले. कामाची माहिती नसेल तर काम करू नका. तुम्ही या पदाचा राजीनामा द्या, अशी मागणी केली. नक्की कशामुळे अडचण सापडत नाही हेच अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नव्हते. या साठी बाहेरील कर्मचारी बोलाविण्यात आले. रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढत होती. रात्री दीड वाजता इंदिरानगरमधील ट्रान्सफॉर्मवर तीन कर्मचारी कोणतीही सुरक्षततेची साधने नसताना काम करत असताना एका कर्मचाऱ्याला विजेचा धक्का बसला. इतर दोन कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून ठेवल्याने मोठी दुर्घटना टळली. नागरिकांच्या मदतीने त्याला खाली उतरविण्यात आले. त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले.
चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी स्वत: काम करावे, अशी मागणी नागरिकांनी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
अजून किती वेळ लागणार असल्याचे नागरिक विचारत होते. मात्र, याबाबत काहीही सांगता येत नसल्याचे अधिकारी सांगत होते.
पहाटे पाच वाजता प्रेमलोक
पार्क, उद्योगनगर, इंदिरानगरमधील काही भागात विद्युतपुरवठा सुरू झाला. मात्र, काही भागातील विद्युतपुरवठा दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतही सुरू झाला नव्हता. महावितरण कंपनीच्या या कामकाजाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्याची बदली करावी व चांगले कार्यक्षम अधिकारी या भागात द्यावेत, अशी मागणी केली आहे.

अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
इंदिरानगरातील ट्रान्सफॉर्मरवर वारंवार आगीच्या ज्वाला बाहेर पडत असल्याने याबाबत नागरिकांनी झोडगे यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. अनेकदा येथे ठिणग्या पडत असल्याने मोठी दुर्घटना होऊ शकते. येथील ट्रान्सफार्मर रस्त्याच्या जवळ व रहिवाशी भागात असल्याने याची जागा बदलावी अथवा दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. मात्र, अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
अकार्यक्षम अधिकाऱ्यांना पदावरून हटवा
वारंवार या भागातील विद्युतपुरवठा खंडित होत आहे. मात्र, तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत वेळकाढूपणाचे धोरण अधिकारी राबवीत आहेत. ग्राहकांशी उद्धट वर्तणूक करीत आहेत. कामाची पूर्ण माहिती नसल्याने अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांची व त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याची त्वरित बदली करावी, अशी मागणी नगरसेविका माधुरी कुलकर्णी, करुणा चिंचवडे व नामदेव ढाके यांनी केली आहे.

Web Title: Stop the road to protest the disrupted power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.