बैलगाडामालकांचा रास्ता रोको
By admin | Published: June 5, 2016 03:38 AM2016-06-05T03:38:24+5:302016-06-05T03:38:24+5:30
‘पेटा हटवा, बैल वाचवा’ अशा घोषणा देत शिवनेरी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य बैलगाडा चालक-मालक संघटनेच्या वतीने नारायणगाव येथे आज (दि.४) पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको
नारायणगाव : ‘पेटा हटवा, बैल वाचवा’ अशा घोषणा देत शिवनेरी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य बैलगाडा चालक-मालक संघटनेच्या वतीने नारायणगाव येथे आज (दि.४) पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यातील तसेच इतर जिल्ह्यातील बैलगाडामालक मोठ्या संख्येने उपस्थित होते़
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवून ‘पेटा हटवा, बैल वाचवा’ या मागणीसाठी शिवनेरी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांच्या नेतृत्वाखाली पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको केला़ दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक टी़ वाय़ मुजावर, मंडलाधिकारी योगेश पाडळे व तलाठी नितीन चौरे यांनी निवेदन स्वीकारून आपल्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचविणार असल्याचे या वेळी सांगितले. या अंदोलनाला पुणे, नगर, कोल्हापूर जिल्ह्यातील बैलगाडा मालक-चालक, शिवनेरी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ या कार्यक्रमाचे नियोजन शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे, बैलगाडा मालक राहुल बनकर, प्रकाश कबाडी, राकेश खैरे, डॉ़ संतोष वायाळ, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, राजेंद्र मेहेर, समीर वाजगे, हेमंत कोल्हे, नीता लांडे, योगेश तोडकर आदींनी केले़ या वेळी परमेश्वर चौधरी म्हणाले, की पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यती बंद केल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. जनावरे पाळण्यासाठी किती कसरत करावी लागते, हे ‘पेटा’वाल्यांना ज्ञात नाही़ पुणे जिल्ह्यातील खासदार बैलगाडा बंदीविषयी आवाज न उठवता गप्प आहेत़ मात्र बैलगाडा मालकांच्या जीवावरच हे राजकीय नेते मोठे झाले आहेत़ आता मात्र त्यांचे या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे़ प्राणी संघटनेचे सदस्य असलेले अनिल कटारीया म्हणाले, की ज्यांनी कधी शेती केली नाही, जनावरे पाळली नाहीत अशा व्यक्तींना शेतकरी व बैल यांच्यातील असलेला जिव्हाळा, शेतकरी बैलाला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करतात़ याची जाणीव प्राणीमित्र सदस्यांना नसल्याने फक्त आपल्या स्वार्थासाठी व पेटा संघटनेच्या फायद्यासाठी ही बंदी आणली आहे़ मात्र या प्राणीमित्र सदस्यांनी ग्रामीण भागात येवून प्रत्यक्षात शेतकरी अथवा बैलगाडा मालक बैलाचा कशा प्रकारे सांभाळ करतात. त्यांना राहण्यासाठी कशा सुखसुविधा उपलब्ध केल्या आहेत हे पाहावे़ शर्यती सुरू होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे या वेळी त्यांनी सांगितले. पेटाने स्वत:च्या फायद्यासाठी ही बंदीचा घाट घातला आहे, असा आरोप रामकृष्ण टाकळकर यांनी केला आहे़ (वार्ताहर)
...तर बेमुदत आंदोलन!
मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविली होती़ त्या वेळी केंद्रीय परिवहनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन बैलगाडा सुरू होण्यासाठी केंद्राच्या मार्फत राजपत्र जारी केले होते़ परंतु, पेटा संस्थेने पुन्हा केंद्राच्या राजपत्राच्या निर्णयाविरोधात अपील करून स्थगिती मिळविली़
यावर (दि़ २८) जुलै रोजी न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. निर्णय विरोधात गेल्यास मुंबई येथील आझाद मैदानावर या निर्णयाविरोधात अखिल भारतीय बैलगाडा मालक-चालक संघटना व शिवनेरी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असे या वेळी सांगितले.