सांडपाणी बंद करा!
By Admin | Published: February 12, 2015 11:51 PM2015-02-12T23:51:16+5:302015-02-12T23:51:16+5:30
रांजणगाव एमआयडीसीने सांडपाणी केंद्रातील पाणी खाली फलकेमळ््यापर्यंत ओढ्यांना सोडणे बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण आढावा
शिरूर : रांजणगाव एमआयडीसीने सांडपाणी केंद्रातील पाणी खाली फलकेमळ्यापर्यंत ओढ्यांना सोडणे बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण आढावा बैठकीत आज दिले. महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि. या कारखान्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
रांजणगाव एमआयडीसीतील उद्योगांमुळे होत असलेल्या प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी नियुक्त
करण्यात आलेल्या समितीची आज येथील तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली.
तहसीलदार रघुनाथ पोटे अध्यक्षस्थानी होते. या एमआयडीसीतील अनेक कारखाने सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते सामुदायिक सांडपाणी केंद्रात सोडतात.
या केंद्रातही या पाण्यावर प्रक्रिया न करता ते पाणी ओढ्याला सोडले जाते. ते पाणी फलकेमळ््यापर्यंत जाऊन पोहोचते. या दूषित पाण्यामुळे विहिरींच्या पाण्याचे स्रोत खराब झाले आहेत.
याबाबत क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना अवगत केले. यावर सोमवारपर्यंत सामुदायिक सांडपाणी केंद्रातून ओढ्याला पाणी सोडणे बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस. एच. पडवळ यांनी एमआयडीसीला दिले.
पेप्सिको, पॉली व अॅब्जॉटिक या कारखान्यांनी एमआयडीसीच्या पाईपलाईनला सांडपाणी सोडू
नये, असे आदेश देण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
सरदवाडी व कर्डेलवाडी या गावांना एमआयडीसीने पाईपलाईन टाकून मोफत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी पाचंगे यांनी बैठकीत केली. (वार्ताहर)