विरोधकांचा दाबला आवाज... महापौरांचा चढला पारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 04:53 PM2019-11-11T16:53:11+5:302019-11-11T16:54:30+5:30
पुण्यातील नागरी समस्यांवरून विरोधक बरसले
पुणे : महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी पक्षांनी प्रतिकात्मक झोपा काढत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवले. सभा सुरू झाल्याबरोबर विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. बराटे यांचे बोलणे संपताच तहकुबी मांडण्यात आली. त्यामुळे विरोधी पक्षांचे नगरसेवक संतापले. त्यांनी आपले म्हणणे मांडू देण्याची विनंती केली. परंतु, महापौर मुक्ता टिळक यांचा यावेळी पारा चढला. त्यांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बोलू दिले नाही.
आचारसंहिता लागल्यानंतर पहिलीच सर्वसाधारण सभा सोमवारी बोलावण्यात आली होती. या सभेला दुपारी तीन वाजता सुरुवात झाली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नगरसेवकही या सभेला उपस्थित होते. सभेला सुरुवात होताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सदस्यांनी घंटा वाजवीत महापौरांच्या समोरील मोकळ्या जागेमध्ये आंदोलन करायला सुरुवात केली. झोपलेल्या प्रशासनाचा निषेध असा मजकूर असलेले बॅनर्स अंगावर घेऊन नगरसेवक एड. भैय्यासाहेब जाधव आणि योगेश ससाणे यांनी झोपून घोषणाबाजी केली. तसेच विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगतपा, दीपक मानकर, अविनाश बागवे, नगरसेविका अश्विनी जगताप, यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका या आंदोलनात सहभागी झाल्या.
महापौर मुक्ता टिळक यांनी सर्वांना जागेवर बसून आपापले विषय मांडण्याची विनंती केली. त्यानुसार, सर्व सदस्य जागेवर गेले. त्यानंतर दिलीप बराटे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. बराटे म्हणाले, 'आचारसंहिता संपत आली. दिवाळी संपली. परंतु अद्यापही शहरातील कामे सुरू झालेली नाहीत. पावसाळ्यात ज्या ज्या रस्त्यांवर पाणी तुंबले, त्याठिकाणी वाहतूक कोंडी झाली तेथे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. अशा ठिकानांची यादी केली आहे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ओढे-नाले याला पूर येऊन मोठे नुकसान झाले आहे. त्याविषयी प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत. पुणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. शहरात सध्या अघोषित पाणी कपात सुरू आहे. पालिकेचे पंपिंग स्टेशन जलसंपदा विभागाने ताब्यात घेतले आहे. आपले त्यावर नियंत्रण नाही. पाऊस पडूनही पुणेकरांना पाणी न मिळत नाही. हडपसर, वडगाव शेरी, कात्रज भागात पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. पुण्यातील खड्डे तसेच आहेत. मेट्रोच्या कामाच्या ठिकाणीही वाहतूक कोंडी होत आहे. या समस्यांकडे सत्ताधारी लक्ष देत नाहीत अशी टीका बराटे यांनी केली.
यावर महापौर टिळक यांनी अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांना खुलासा करण्यास सांगितले. परंतु, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आम्हालाही बोलू द्या अशी विनंती केली. परंतु, महापौरांनी त्याला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा मोकळ्या जागेत येत घोषणाबाजी आणि घंटानाद करायला सुरुवात केली. या गदारोळात महापौरांनी तहकुबी पुकारत सर्वसाधारण सभा 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.