कोऱ्हाळेकरांचा रास्ता रोको
By admin | Published: March 26, 2017 01:28 AM2017-03-26T01:28:46+5:302017-03-26T01:28:46+5:30
महावितरण कंपनीने विज पुरवठा खंडीत केल्याने कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील सार्वजनिक
वडगाव निंबाळकर : महावितरण कंपनीने विज पुरवठा खंडीत केल्याने कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील सार्वजनिक पाणीपुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासुन बंद आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत .नागरीकांच्या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी व महावितरणच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतिश खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नीरा बारामती मार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.
संतप्त ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळे वाहतूक अर्धा तास ठप्प होती. दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसही आंदोलकांची समजूत घालत होते. पण ग्रामस्थांचे पाणी बंद रस्ता बंद... महावितरणचा निषेध असो, अशा घोषणा तीव्र होत होत्या. महावितरणचे अधिकारी लवकर आले नाहीत .
अखेर पोलिसांनी संबधीतांना फोनवरून आंदोलनस्थळी लवकर उपस्थित रहा, असे कळवले. यानंतर महावितरण कार्यालयातील प्रज्ञेश जाधव, सोमेश्वर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे येथे पोहोचले. त्यांनी आंदोलकांचे मत ऐकुन घेतले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी मंडलअधिकारी उदय कदम, सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील उपस्थीत होते. आंदोलनात दिलीप खोमणे, रवींद्र खोमणे, अंकुश चव्हाण, अनिल चव्हाण, नंदकुमार मोरे, महेश चव्हाण, हरिचंद्र पवार, कासमभाई सय्यद आदी उपस्थित होते.(वार्ताहर)
आडमुठे धोरण : अधिकाऱ्यांशी चर्चा
गेल्या पंधरा दिवसांपासून सार्वजनिक पाणीपुरवठा बंद पडल्याने ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. महावितरण कंपनीने आडमुठे धोरण अवलंबले आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही कोऱ्हाळे बुद्रुक येथील ग्रामस्थ जमलो आहोत, अशा तीव्र भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यात आले.