पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By admin | Published: May 28, 2017 03:49 AM2017-05-28T03:49:07+5:302017-05-28T03:49:07+5:30
इंदापूर तालुक्यात सध्या पाणी पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . इंदापूर तालुक्यातील गोतंडी चोपनफाटा या फाट्यावरील शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाणी
- लोकमत न्यूज नेटवर्क
निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यात सध्या पाणी पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . इंदापूर तालुक्यातील गोतंडी चोपनफाटा या फाट्यावरील शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. त्यामुळे आज येथील शेतकऱ््यांनी इंदापूर बारामती राज्य महामार्ग सुमारे एक तासापेक्षा जादा वेळ रोखून धरला. आंदोलनामुळे राज्य महामार्गावर दोन्ही बाजूने सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
पाण्याअभावी शेतातील पिके पाण्यावाचून जळून चालली आहेत. लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. आज या रास्ता रोकोत इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणेही सामील झाले होते. तर येथील शेतकऱ्यांंना पाण्यावाचून वंचीत ठेवल्याने आमदार भरणे यांनी पाण्याच्या व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या या रास्त मागणीला माझा पूर्ण पाठींबा आहे ,असे सांगीतले. या वेळी भरणे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांना संपर्क साधला. या वेळी परिसरातील शेतकरी कडक उन्हामध्ये मोठ्या संख्येने या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते. सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळ लोकांनी महामार्ग रोखून धरला. शेवटी आमदार भरणे यांनी यांनी शेतकऱ्यांंशी चर्चा करून महामार्ग मोकळा केला. या वेळी पाटील यांनी देखील राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे व पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यांच्याशी संपर्क साधून वंचित शेतकऱ्यांना चालु आर्वतनातील पाणी तातडीने देण्याची मागणी केली.
५४ फाट्यावरील शेतीला वेळेवर पाणी न मिळाल्याने गोतोंडी, निमसाखर, हगारेवाडी, शिरसटवाडी, घोरपडवाडी, दगडवाडी, जैनवाडीसह इतर गावातील पिके करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग संतप्त झाला. केवळ तोंड बघून सध्या जलसंपदा विभागाचा कारभार चालू आहे. नीरा डावा कालव्यावरील ५४ फाट्याबरोबरच अन्य वितरीकेवरील पिकांना पाणी न मिळताच बंद झाले.
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ््यांवर व इंदापूर तालुक्यावर शेतीच्या पाण्याच्या बाबतीत अन्याय झाला आहे. जलसंपदा विभागाने निरा डावा कालव्यातुन पुर्ण क्षमतेने पाणी आणून शेतीला तातडीने पाणी देण्याचे नियोजन करून वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिलेच पाहीजे, अन्यथा पुणे येथील सिंचन भवनावरती शेतक ऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी मोर्चा काढण्याचा, इशारा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी दिला.
रास्ता रोको दरम्यान थोड्या उशिरा हर्षवर्धन पाटील यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची भेट घेउन पाठींबा व्यक्त केला. शेतकरी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली.
या वेळी पाटील पुढे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना भाटघर धरणाच्या नीरा डावा कालव्यातून येणारे पाणी हे उन्हाळी हंगामातील पिकांना देण्याचे नियोजनामध्ये ठरले आहे.
फाटा क्र. ५४ वरील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी न मिळाल्यामुळे पिके पूर्णपणे जळालेली आहेत. भाटघरच्या धरणातील पाण्यावर इंदापूर तालुक्याचे हक्काचे पाणी गेले कुठे? शेतीला पाणी का मिळत नाही? यास जबाबदार कोण आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी व्यक्त केली .