दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचा मंचरला रास्ता रोको
By admin | Published: March 11, 2016 01:48 AM2016-03-11T01:48:49+5:302016-03-11T01:48:49+5:30
दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय परवडत नाही. तो बंद करण्याच्या मन:स्थितीत आहे. त्यामुळे दुधाची उपलब्धता कमी होऊन राष्ट्रीय संकट ओढवण्याची शक्यता आहे
मंचर : दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय परवडत नाही. तो बंद करण्याच्या मन:स्थितीत आहे. त्यामुळे दुधाची उपलब्धता कमी होऊन राष्ट्रीय संकट ओढवण्याची शक्यता आहे. शासनाने दूध दरवाढीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारला जाईल, असा इशारा पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे यांनी दिली.
दुधाच्या दरात वाढ व्हावी यासाठी शिवनेरी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे-नाशिक महामार्गावर अवसरी फाटा येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवनेरी शेतकरी संघटनेचे प्रांत अध्यक्ष राजेंद्र ढोमसे, तालुकाध्यक्ष राजेंद्र शेवाळे, महिला अध्यक्षा नीता लांडे यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवनेरी शेतकरी संघटनेचे हेमंत कोल्हे, रमेश कोल्हे, सोनाली वाळुंज, प्रशांत सैद, राजू शेवाळे, मच्छिंद्र चौरे, खंडू ढेरंगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
बी. डी. आढळराव पाटील यांनी दुधाचा उत्पादनखर्च वाढत असताना अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या दुधाला लिटरमागे ३२ रुपये बाजारभाव मिळावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी राजेंद्र ढोमसे, राजेंद्र शेवाळे, नीता लांडे यांनी मनोगत
व्यक्त केले.
तहसीलदार बी. जे. गोेरे, विष्णूकाका हिंगे, पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना निवेदन देण्यात आले. शेतकरी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हेमंत कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले. या आंदोलनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी व शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र आल्याचे पाहावयास मिळाले. (वार्ताहर)