‘हक्का’च्या पाण्यासाठी रास्ता रोको- हर्षवर्धन पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:16 AM2018-09-21T01:16:43+5:302018-09-21T01:16:49+5:30
इंदापूर तालुक्याला गेली चार वर्षे झाले ‘हक्काचे’ पाणी मिळत नाही.
पळसदेव : इंदापूर तालुक्याला गेली चार वर्षे झाले ‘हक्काचे’ पाणी मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतीसह पिण्याच्या पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. जर पुणे शहराला तुम्ही १८ टीएमसी पाणी ‘राखीव’ ठेवू शकता तर आमच्या हक्काचे खडकवासला व नीरा डाव्या कालव्याचे पाणी का मिळू शकत नाही. तालुक्यातील लोकप्रतिनिधी अकार्यक्षम आहेत. असा हल्लाबोल करीत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि. २0) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव (ता. इंदापूर) येथे रास्ता रोको आंदोलन केले.
काँग्रेस पक्षाच्या वतीने सुमारे दोन तास हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जवळपास चार हजार शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. दोन वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील पाझर तलावांमध्ये पाणी येत नाही. शेतकऱ्यांनी घोषणा देत व हातात फलक घेऊन शासनाचा निषेध केला. ‘पाणी आमच्या हक्काचे; नाही कुणाच्या बापाचे, निष्क्रिय लोकप्रतिनिधीचा धिक्कार असो, कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही.’
अशा घोषणा देत व नीरा डाव्या कालव्याचे पाणी मिळालेच पाहिजे, नीरा व भीमा नदीवरील सर्व बंधारे भरलेच पाहिजे, खडकवासला कालव्याचे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, निष्क्रिय लोकप्रतिनिधीचा निषेध असो, असे फलक घेऊन शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महामार्गावर चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पाटील म्हणाले, चार वर्षांपासून शेतकºयांवर पाण्याबाबत अन्याय होत आहे. आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकप्रतिनिधी अधिकाºयांना भेटतात व आवर्तनातून पाणी सोडल्याचे सांगतात. त्यांना पाण्याचा ‘गेझ’बघण्याचे कसे आठवले? भाटघर सणसर ३६ फाटा ते ५९ फाट्यापर्यंत ७.१९ टीएमसी पाणी मिळणे गरजेचे असून, सणसर कटचे ३.२ टीएमसी पाणी गेले कुठे? अन्याय कराल, तर त्यांची सुटी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पाणी येऊ शकत नसेल तर आमदारांना नैतिक पदावर बसण्याचा अधिकार नाही.
या वेळी मुरलीधर निंबाळकर, अॅड. कृष्णाजी यादव, मयूर पाटील, दीपक जाधव, शिवाजी कन्हेरकर, नीलेश कन्हेरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बनसुडे, दीपक जाधव, संपत बंडगर, रंगनाथ देवकाते, भूषण काळे, आदी उपस्थित होते.
>खडकवासला कालव्याचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी. के. शेटे व तहसीलदार सोनाली मेटकरी त्यांच्यासमोर बसून चर्चा करू लागले. मात्र आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते. पाटीलही आक्रमक झाले. पुण्याच्या पाण्याबाबत कायदा नाही. मात्र आमच्या हक्काच्या पाण्याबाबत असा कायदा कसा? असा प्रश्न त्यांनी केला. आठ दिवसांत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.खडकवासला कालव्याचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, पुणे पाटबंधारे विभागाचे व नीरा डावा कालव्याचे अभियंता बी. के. शेटे, इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर उपस्थित होते. पोलीस निरीक्षक मधुकर पवार, सहायक पोलीस निरीक्षक नांगरे, दंगल नियंत्रक पथकाचे जवानांनी बंदोबस्त ठेवला होता. तालुका अध्यक्ष कृष्णाजी यादव, रमेश जाधव, विलास वाघमोडे, अशोक शिंदे, हनुमंत बनसुडे, शरद चितारे, अंकुश पाडुळे यांची भाषणे झाली.