रेल्वे कुरकुंभ मोरीत रास्ता रोको
By admin | Published: June 15, 2017 04:46 AM2017-06-15T04:46:05+5:302017-06-15T04:46:05+5:30
येथील रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी दौंड नगर परिषद, रेल्वे प्रशासन यांच्याविरोधात निषेधाच्या घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड : येथील रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी दौंड नगर परिषद, रेल्वे प्रशासन यांच्याविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात येत होत्या. मंगळवारी (दि. १३) सायंकाळी शहरात तुफान पाऊस झाला. रेल्वे कुरकुंभ मोरीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. तेव्हा अजनुज (ता. श्रीगोंदा) येथील महादेव मारुती शितोळे या व्यक्तीचा पाय रेल्वेच्या नाल्यात घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले. येथील नेने चाळीतील नाल्यात या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
या व्यक्तीच्या मृत्यूला नगर परिषद आणि रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीने जोर धरला होता. या घटनेमुळे नगर परिषद आणि रेल्वे प्रशासनाच्या विरोधात नागरिकांत संतापाची लाट होती. दरम्यान, या घटनेचा निषेध म्हणून शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली होती. नवीन रेल्वे कुरकुंभ मोरीचे काम झाले पाहिजे.
कुरकुंभ मोरीचे काम अडविणाऱ्या राजकीय मंडळींना धडा शिकवला पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या आशयाच्या आंदोलक घोषणा देत होते. या वेळी शिवसेनेच्या उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी यांनीदेखील या घटनेचा निषेध केला आहे. शिवसेनेचे राजेंद्र खटी, अनिल सोनवणे, संतोष जगताप, आनंद पळसे, गणेश दळवी, आकाश झोजे, कैलास शहा, नामदेव राहिंज, रूपेश बंड, अनिकेत बहिरमल, शैलेश पिल्ले, अजित फुटाणे, श्रीराम ग्रामपुरोहित, विक्रम इंगवले, गणेश पवार उपस्थित होते. रेल्वेच्या नाल्यावर ढापे टाकले जातील, असे आश्वासन मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिल्यावर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले.
पोलीस ठाण्यामध्ये राष्ट्रवादी आक्रमक
रेल्वे कुरकुंभ मोरीच्या परिसरातील रेल्वेच्या नाल्यात महादेव शितोळे वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा नगर परिषद आणि रेल्वे प्रशासन यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, म्हणून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पोलीस ठाण्यामध्ये आक्रमक पवित्रा घेतला.
या वेळी बादशहा शेख, शिवसेनेच्या उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी, इंद्रजित जगदाळे, विलास शितोळे, वसीम शेख, रिजवाना पानसरे, संध्या डावखर, ज्योती राऊत, प्रणोती चलवादी, मोहन नारंग, गौतम साळवे, गुरुमुख नारंग, सोहेल खान, विनोद नगरवाल यांनी सांगितले, की ४८ तासांच्या आत चौकशी करून कारवाई करतो. पोलीस म्हणाले, की तातडीने आताच गुन्हा दाखल झाला पाहिजे.
...आणि काळाने झडप घातली : महादेव शितोळे अजनुज (ता. श्रीगोंदा) येथून पुण्याला निघाले होते. रेल्वे स्टेशन परिसरात ते पोहोचले. परंतु जोराचा पाऊस सुरू झाल्याने त्यांनी पुण्याला जाण्याचे रद्द केले आणि घरी परत येताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.