पुरंदर उपसाच्या पाण्यासाठी रास्ता रोको
By admin | Published: July 25, 2015 05:00 AM2015-07-25T05:00:42+5:302015-07-25T05:00:42+5:30
पुरंदर उपसा सिंचन योजना तातडीने पूर्ण करून बारामतीच्या जिरायती भागात पाणी सोडावे. पशुधन वाचविण्यासाठी चारा डेपो सुरू करावेत
लोणी भापकर : पुरंदर उपसा सिंचन योजना तातडीने पूर्ण करून बारामतीच्या जिरायती भागात पाणी सोडावे. पशुधन वाचविण्यासाठी चारा डेपो सुरू करावेत. यासह अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील १६ जिरायती गावातील ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि. २४) लोणी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन केले. या योजनचे वीजबील टंचाई निवारण निधीतून शासनाने भरावे, ही मागणी केली.
रास्तारोको आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली. बारामती तालुक्यातील कऱ्हा नदीच्या दक्षिणेकडील जवळपास २२ गावांतील अर्थकारण केवळ पावसावर अवलंबून आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेतून यातील १६ गावांतील सुमारे २५ हजार एकर क्षेत्र ओलीताखाली येणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, अद्याप योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. त्यातच मागील चार वर्षांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने ही गावे पाणी, चारा व रोजगारटंचाई झेलत आहेत. बहुतांश कुटुंबांची रोजीरोटी दूध उत्पादनावर अवलंबून आहे. मात्र चाऱ्याअभावी दारातील दुभती जनावरे सांभाळणे जिकिरीचे होऊ लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेकजण दुभती जनावरे विकू लागले आहेत. तर या भागातील अनेक गावे व वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
मागील काही काळात या भागातील पाझर तलाव बंधारे, ओढा खोलीकरणाची कामे झाली आहेत. तर पुरंदर योजनचे काम काही भागात पूर्ण झाले आहे. ेत्यातून पाणी सोडून खोलीकरण झालेल्या ठिकाणी पाणी सोडण्याची मागणी येथील ग्रामस्थ सातत्याने करीत आहेत. मात्र, त्याकडे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज लोणीभापकरसह १६ गावांतील ग्रामस्थांनी बारामती-मोरगाव रस्त्यावर लोणी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी पुरंदर उपसा सिंचन योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे व पाणी सोडावे. त्यासाठीचा वीजखर्च टंचाई निवारण निधीतून शासनाने भागवावा. तसेच पशुधन वाचविण्यासाठी जिरायती भागात तातडीने चारा डेपो सुरू करावेत.
जिरायती गावांतील प्रत्यक्ष पीक परिस्थिती पाहून आणेवारी मोजावी. पुरंदर योजनेतून वंचित राहिलेल्या भागाचे फेरसर्वेक्षण करावे. त्या भागात योजनेचे पाणी द्यावे. या मागण्यांचे निवेदन या वेळी शासनाला देण्यात आले.
या वेळी बारामतीचे नायब तहसीलदार शामराव अडागळे, पुरंदर उपसाचे एम. आर. ननावरे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सतीश शिंदे तसेच १६ गावांतील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)