वाळूउपसा रोखला , कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 05:14 AM2017-10-03T05:14:43+5:302017-10-03T05:14:48+5:30
देऊळगावराजे (ता. दौंड) येथील बंधा-याशेजारी चालणारा अवैध वाळूउपसा अखेर ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी यांनी बंद केला आहे.
देऊळगावराजे : देऊळगावराजे (ता. दौंड) येथील बंधा-याशेजारी चालणारा अवैध वाळूउपसा अखेर ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी यांनी बंद केला आहे.
गेल्या एका महिन्यापासून देऊळगावराजे येथील बंधा-याशेजारी पाच फायबर आणि पाच यांत्रिक बोटींनी अवैधरीत्या वाळूउपसा चालू होता. या वाळूउपशामुळे बंधा-याला धोका निर्माण झाला होता. याबाबत शेतक-यांनी अनेकदा महसूल विभागातील तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या; परंतु कारवाई मात्र केली जात नव्हती. देऊळगावराजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अनिता बुराडे यांचे पती तुळशीदास बुराडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश आवचर, चेतन औताडे, सचिन आवचर, किरण सूर्यवंशी, योगेश आवचर, संतोष लाव्हार आदी शेतकºयांनी मिळून हा वाळूउपसा बंद केला. महसूल विभागाकडून या वाळूचोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील शेतकºयांनी दिला आहे. या वाळूचोरांकडून दररोज ५० ते ६० ब्रास वाळू येथून भरून नेली जात होती. त्यामुळे गावातील रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले होते. रोजचा रहदारीचा हा रस्ता असल्याने येथील शेतकºयांना शेतीपंप चालू करण्यासाठी व जनावरांचा चारा आण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागायचा; परंतु या रस्त्यावरून वाळूउपसा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ये-जा करणेही अवघड झाले होते.
बंधाºयाच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाळूच्या ढिगाचा आधार होता आणि तीच वाळू या वाळूचोरांनी उपसायला सुरवात केली असल्यामुळे बंधाºयाला मोठा धोका होऊ शकतो. वेळीच महसूल विभागाने लक्ष दिले, तरच अवैध वाळूउपसा बंद होईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती.