विद्युत खांबावरील आकड्यांना अटकाव
By admin | Published: January 7, 2016 01:31 AM2016-01-07T01:31:59+5:302016-01-07T01:31:59+5:30
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) तारांवर आकडे टाकून बेकायदापणे वीजजोड घेण्याचे प्रकार शहरातील काही भागांत सर्रासपणे सुरू आहेत
पिंपरी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) तारांवर आकडे टाकून बेकायदापणे वीजजोड घेण्याचे प्रकार शहरातील काही भागांत सर्रासपणे सुरू आहेत. हे रोखण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामुळे वीजचोरीला आळा बसणार असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
दाट वस्तीच्या भागात तारेवर आकडे टाकून वीजचोरी केली जाते. सायंकाळनंतर हे आकडे टाकले जातात. महावितरणचे पथक येताच ते काढून घेतले जातात. यामुळे कारवाई करताना पथकास बंधने येतात. त्यावर तोडगा काढण्यात आला आहे. या तारांतून वीजप्रवाह जाणार नाही, अशा एअर बंच कंडक्टर (एबी) इन्सुलेशन केबल जोडण्यात आल्या आहेत.
पूर्वीच्या तारा काढून त्या ठिकाणी ही एबी केबल जोडण्यात येत आहे. त्या केबलवर आकडे टाकून वीजचोरी करता येणार नसल्यामुळे अशा चोरीस पूर्णपणे अटकाव होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, अपघात होत असलेल्या ठिकाणी या प्रकारच्या केबल बसविण्यात येत आहेत. विशेष मोहिमेत हे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे. शहरभरात या प्रकारे एबी केबल टाकले जाणार आहेत.
पिंपरी बाजारपेठेत अशा प्रकारे केबल जोडल्या आहेत. भाटनगर येथील २६ खांब आणि लिंक रोड येथील २२ खांबांवर, त्याचबरोबर मिलिंदनगर भागात अशा प्रकारची केबल जोडली आहे. गांधीनगरातील अनेक खांबांवर अशा प्रकारे केबलजोडणी केली गेली आहे. याचबरोबर शहरातील झोपडपट्ट्या, वस्त्या अशा दाट भागातील वीजवाहक तारांवर केबलजोडणी केली गेली आहे. भोसरीतील महात्मा फुले झोपडपट्टीतील अनेक खांबांवर एबी केबल बसविल्या आहेत.
एबी केबलमुळे आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही. वीजचोरीच्या माध्यमातून होणारे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान यामुळे टाळण्यास मदत होणार आहे. तसेच, वीजचोरी करताना होणाऱ्या दुर्घटना रोखल्या जातील.
वीज चोरून घेण्यापेक्षा थेट मीटरजोड घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत नागरिकांना त्वरित वीज मीटरजोड दिला जात आहे. झोपडपट्टी
भागात याप्रमाणे अनेक मीटरजोड दिले गेले आहेत.
वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने विशेष तपासणी मोहीम राबवीत आहे. यासाठी स्वतंत्र पथकांची निर्मिती केली गेली आहे. आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात कारवाई केली आहे. यामध्ये वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.(प्रतिनिधी)