सांस्कृतिक आक्रमण थोपवणे प्रत्येकाचीच जबाबदारी- डॉ. प्रभा अत्रे
By राजू इनामदार | Published: October 7, 2023 06:31 PM2023-10-07T18:31:45+5:302023-10-07T18:32:08+5:30
संस्कार भारतीच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची बैठक...
पुणे : विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात त्याचा वापर करून अनेक सांस्कृतिक आक्रमणे होत असतात. ती थोपवणे हे प्रत्येक नागरिकाचे काम आहे. संस्कार भारती संस्थात्मक स्वरूपात ते काम करते आहे ही उल्लेखनीय बाब आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध शास्त्रिय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी केले.
सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या ‘संस्कार भारती’ या संस्थेच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची तीन दिवसांची बैठक पुण्यात नुकतीच झाली. डॉ. अत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीची सुरूवात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष, प्रसिद्ध चित्रकार वासूदेव कामत, अखिल भारतीय महामंत्री डॉ. अश्विन दळवी, उपाध्यक्ष प्रसिद्ध व्हायोलिन वादक डॉ. मैसुर मंजुनाथ, उपाध्यक्षा डॉ. हेमलता मोहन व्यासपीठावर होते.
समारोपाच्या भाषणात कामत यांनी मोबाईल सेल्फी यांच्या अतिवापराचा धोका स्पष्ट केला. सेल्फी काढणे किंवा सतत फोटो काढत राहणे यामुळे त्या विषयावर अथवा एखाद्या सुंदर कलाकृतीवर लक्ष केन्द्रित करण्याऐवजी सर्व लक्ष मोबाईलमधेच असते, त्यामुळे तो विषय त्याला समजतच नाही. यामुळे सर्जनशीलता कमी झाली आहे असे निरिक्षण त्यांनी नोंदवले.
‘राष्ट्रभक्तिकी भागीरथी' हा संघ गीतांवर आधारीत भरत नाट्यम आणि कथ्थक शैलीतील नृत्यरचनांमधून कार्यक्रम सादर करण्यात आला. नृत्यगुरु आस्था कार्लेकर, मैत्रेयी बापट, डॉ. स्वाती दैठणकर, अरुंधती पटवर्धन, डॉ. स्वाती दातार, सुवर्णा बाग आणि त्यांच्या शिष्यांनी नृत्य सादर केले. अभिनेते राहुल सोलापूरकर, प्रांजली देशपांडे यांनी सुत्रसंचालन केले.
बौद्धिक प्रमुख स्वांतरंजन, संघटन मंत्री अभिजीत गोखले, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सतार वादक उस्ताद उस्मान खान, पुणे महानगराचे अध्यक्ष व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. सिने दिग्दर्शक व मार्गदर्शक राजदत्त, डॉ गो. बं. देगलूरकर, संघटन मंत्री अभिजित गोखले, डॉ रवींद्र भारती, नाट्य दिग्दर्शक प्रमोद पवार तसेच इतर मान्यवर पदाधिकारी असे २४८ कलाकार कार्यकर्ते बैठकीला अखिल भारतातून उपस्थित होते.