साठवण पाण्याची टाकी फुटली, टाकीच्या भिंती खाली आल्याने तिन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 11:06 PM2024-02-12T23:06:24+5:302024-02-12T23:06:44+5:30
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जमिन गट नं. २१२ मधील विटभट्टीवर बांधलेल्या पाण्याच्या टाकी मध्ये पाणी भरण्याचे काम चालू होते. त्या वेळी पाण्याची टाकी फुटल्याने टाकीची भिंत अंगावर पडून ३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.
नसरापूर : किकवी (ता. भोर) येथे विट भट्टीवरील पाण्याची साठवण टाकी फुटली. त्यावेळी फुटलेल्या टाकीच्या भिंती खाली ३ वर्षाची चिमुकलीचा नाहक बळी गेला, तर दुसरी १३ वर्षाची मुलगी जखमी झाली असून थोडक्यात बचावली आहे. या अपघातात विद्या पांगू जाधव (वय ३ वर्षे) हिचा मृत्यू झाला असून लक्ष्मी गोविद वाघमारे (वय १३ वर्षे) ही जखमी झाली. दोघीही राहणार किकवी, ता. भोर, जि. पुणे, मुळ राहणार कैलवल ता. माणगाव जि. रायगड येथील रहिवासी आहेत.
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जमिन गट नं. २१२ मधील विटभट्टीवर बांधलेल्या पाण्याच्या टाकी मध्ये पाणी भरण्याचे काम चालू होते. त्या वेळी पाण्याची टाकी फुटल्याने टाकीची भिंत अंगावर पडून ३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. राजगड पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे. या प्रकरणी गणेश उर्फ ईश्वर दत्तात्रय भिलारे (वय 27 वर्षे रा. किकवी ) यांनी राजगड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
लक्ष्मीवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. प्रसंगावधान ओळखून तेथील उपस्थित नागरिकांनी दोघींना विटांच्या ढिगाऱ्या खालून बाहेर काढले होते.