शहरात वादळी वाऱ्याने ४० वृक्ष कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:10 AM2021-05-17T04:10:07+5:302021-05-17T04:10:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाचा पुणे शहर व जिल्ह्यात मोठा परिणाम दिसून आला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाचा पुणे शहर व जिल्ह्यात मोठा परिणाम दिसून आला आहे. पुणे शहरात सायंकाळी ७ वाजेपर्यंत वेगवान वाऱ्यामुळे ४० झाडे पडली. बारामती येथे महावितरणाचे खांब कोसळल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला, तर खेड तालुक्यात ८७ घरांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. शहरात सहकारनगर येथील तुळशीबागवाले कॉलनीत पार्क केलेल्या मोटारीवर झाड कोसळून मोटारीचे नुकसान झाले.
पुणे शहरात शनिवारी रात्री जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली. त्याबरोबरच पावसाला सुरुवात झाली होती. रात्री ९ वाजेपासून सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत ११ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. दुपारनंतर वाऱ्याचा वेग जसा वाढला. ताशी ५० ते ५५ किमी वेगाने वारे वाहू लागले, तसे झाडे उन्मळून पडण्याचा वेगही वाढला. रविवारी कडक लाॅकडाऊन त्यात जोरदार वारे वाहत असल्याने पुणेकर आज नेहमीपेक्षा कमीच बाहेर पडलेले दिसून आले. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ४.१ मिमी, पाषाण येथे ३.८ मिमी. तर लोहगाव येथे ९.६ मिमी पावसाची नोंद झाली होती.
शहरातील जवळपास सर्व भागांत झाडपडीच्या घटना घडल्या. त्यात प्रामुख्याने मुकुंदनगर, येरवडा, हडपसर, धनकवडी, कल्याणीनगर, कात्रज, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, ज्ञानेश्वर पादुका चौक, सोलापूर बाजार, विश्रांतवाडी, सिहंगड रोड, नवी पेठ, कोरेगाव पार्क, गंज पेठ, सारसबाग, टिंगरेनगर या भागांत झाडपडीच्या घटना घडल्या. सायंकाळी सात वाजेपर्यंत अशा ४० घटना घडल्या. पुणे शहरात आकाश ढगाळ राहून सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात आज दिवसभर आकाश ढगाळ होते. सायंकाळच्या सुमारास काही वेळ पावसाच्या हलक्या सरी येऊन गेल्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे २.३, लोहगाव १.२ मिमी पावसाची नोंद झाली होती.
पणजीत १२४ मिमी पावसाची नोंद
चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका पणजी शहराला बसला असून तेथे सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी ३६, कोल्हापूर १४, महाबळेश्वर ३, सांगली ७, सातारा ३, औरंगाबाद २०, परभणी २, अमरावती ७ मिमी पावसाची नोंद झाली होती.
फोटो - सहकारनगर येथील तुळशीबागवाले कॉलनीत पार्क केलेल्या मोटारीवर झाड कोसळून मोटारीचे नुकसान झाले.