कुमार रिसॉर्टवर तुफान दगडफेक
By admin | Published: February 19, 2015 02:04 AM2015-02-19T02:04:34+5:302015-02-19T02:04:34+5:30
हॉटेल कुमार रिसॉर्टच्या टेरेसवर मंगळवारी दुपारी मृतावस्थेत आढळलेल्या सात वर्षीय बालिकेवर बलात्कार करून खून करण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे़
लोणावळा : हॉटेल कुमार रिसॉर्टच्या टेरेसवर मंगळवारी दुपारी मृतावस्थेत आढळलेल्या सात वर्षीय बालिकेवर बलात्कार करून खून करण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे़ या प्रकरणाच्या निषेधार्थ लोणावळ्यात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला़ तसेच निंदनीय प्रकाराचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला अचानक हिंसक वळण लागले आणि आंदोलनकर्त्यांनी हॉटेल कुमार रिसॉर्टवर तूफान दगडफेक केली. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला़ यात आठ पोलीस व सात आंदोलक जखमी झाले.
कुमार रिसॉर्टमध्ये रविवारी एका लग्न समारंभाकरिता इंदापूर, रायगड येथील छगन जैन ७ वर्षांच्या मुलीसह आले होते़ लग्नसमारंभादरम्यान रात्री साडेआठनंतर त्यांची मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. पण ती न सापडल्याने शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्री सुरुवातीला ‘बेपत्ता’ची तक्रार व नंतर अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला़
मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास मुलीचा मृतदेह हॉटेलच्या टेरेसवर सोलर पॅनेलच्या खाली आढळला होता़
पुण्यातील ससून रुग्णालयात केलेल्या शवविच्छेदनाचा अहवाल बुधवारी दुपारी प्राप्त झाला. त्यानुसार मुलीचा मृत्यू बलात्कार करून गळा चिरल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले़
कुमार हॉटेलच्या व्यवस्थापनाने नातेवाइकांना हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज पाहू दिले नाही. हॉटेलमध्ये शोधाशोध करू दिली नाही़ याच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यासाठी कुमार चौकात जमलेल्या लोकांनी हॉटेलवर तूफान दगडफेक केली. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग देखील एक ते दीड तास रोखण्याता आला़ हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करावा लागला.
या प्रकरणातील दोषींना तातडीने अटक करत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या डॉ़ नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक मनोजकुमार लोहिया यांच्याकडे केली आहे़