वादळी सभेने नव्या महापौरांचे स्वागत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2016 04:11 AM2016-02-25T04:11:22+5:302016-02-25T04:11:22+5:30
नव्या महापौरांना पदार्पणातच महापालिकेच्या वादळी सभेचा सामना करावा लागणार आहे. उद्या (गुरूवारी) सकाळी ११ वाजता त्यांची निवड होईल व त्यानंतर लगेचच सायंकाळी
पुणे : नव्या महापौरांना पदार्पणातच महापालिकेच्या वादळी सभेचा सामना करावा लागणार आहे. उद्या (गुरूवारी) सकाळी ११ वाजता त्यांची निवड होईल व त्यानंतर लगेचच सायंकाळी ५ वाजता स्मार्ट सिटीसाठीच्या वादग्रस्त एसपीव्ही कंपनीच्या मसुद्याचा विषय असलेली खास सभा होणार आहे.
सकाळी ११ वाजता महापौर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशांत जगताप यांची, तर भाजपाने अशोक येनपुरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे मुकारी अलगुडे, तर भाजपाच्या वर्षा तापकीर उमेदवार आहेत. उमेदवारी अर्जमाघारी, त्यानंतर झाले तर मतदान, त्यानंतर विजयी उमेदवारांचा गौरव करणारी भाषणे यांत बराच वेळ जाईल. महापौरांची निवड झाल्यानंतर त्याच पद्धतीने लगेचच उपमहापौरांचीही निवड होईल. या दोन्ही प्रक्रियांमध्येच दुपारचे २ वाजण्याची शक्यता आहे.
त्यानंतर लगेचच सायंकाळी ५ वाजता स्मार्ट सिटीसाठीच्या एसपीव्ही मंजुरीची सभा आहे. एसपीव्हीला काँग्रेस, मनसे, शिवसेना यांचा विरोध; तर भाजपा व सत्ताधारी राष्ट्रवादी यांचा पाठिंबा आहे. त्यामुळेच या विषयावर भाषणे होऊन मतदानही होण्याची चिन्हे आहेत. महापौरपदावर विजयी होणाऱ्या उमेदवाराला ही कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी राजकीय खेळी करून एसपीव्ही विरोधाची चुणूक आजच दाखवून दिली आहे. त्यामुळेच नव्या महापौरांना पहिल्याच सभेत जबाबदारीने काम करावे लागेल. (प्रतिनिधी)
महापौरपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता कमी असून, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांची निवड निश्चित आहे. त्यामुळेच ते आज (बुधवारी) मावळते महापौर दत्तात्रय धनकवडे तसेच सभागृहनेते बंडू केमसे यांच्याकडे ‘एसपीव्हीची सभा उद्या नको; नंतर ठेवा,’ अशी विनंती करीत होते. ‘तुम्ही मिरवणूक नंतर काढा; सभा उद्याच होईल,’ असे त्यांना धनकवडे व केमसे यांनी सांगितले.