पुण्यात वादळी पावसाचा जोरदार तडाखा, शहरात ठिकठिकाणी झाडपडीच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 06:42 AM2017-09-30T06:42:14+5:302017-09-30T06:42:41+5:30
विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह शहर व उपनगरांना शुक्रवारी वादळी पावसाने झोडपून काढले. वादळी वा-यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्याने वाहतूककोंडी झाली.
पुणे : विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह शहर व उपनगरांना शुक्रवारी वादळी पावसाने झोडपून काढले. वादळी वा-यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्याने वाहतूककोंडी झाली. काही भागात विजेच्या तारांवर झाड पडल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. शहरातील प्रमुख रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले होते. लोहगाव परिसरात तब्बल २६.३ मिलीमीटर पाऊस पडला. शहरात रात्री साडेआठपर्यंत १०.३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
शहरात सकाळी कडकडीत ऊन होते. मात्र, दुपारनंतर अचानक पावसाला सुरुवात झाली. काही वेळात रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागले. उपनगरांमध्ये अनेक भागात वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी केवळ जोरदार वाºयाने नागरिकांची दैना उडवली. शहरासह उपनगरांमध्येही झाडापडीच्या अनेक घटना घडल्या. काही भागात झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्याने परिसरातील संपूर्ण वीजपुरवठाच खंडित झाला. शिवाजीनगरसह रास्ता पेठ, फातिमानगर, हडपसर, कोंढवा, बाणेर, पाषण, बालेवाडी यांसह विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाला.
शहर व उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पावसाचा जोर कमी-अधिक होता.
झाडे पडल्याने वाहतूककोंडी
वादळी पावसाने जवळपास ४५ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही. हडपसर, औंध, कल्याणीनगर सह शहरातील अनेक भागात झाडपडीच्या जवळपास ४५ घटना घडल्या. फांद्या पडल्याने गाड्यांचे नुकसान झाले. रस्त्यांवर फाद्यांचा खच पडल्याने वाहतूककोंडी झांली होती.
पावसामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. हडपसर, फातिमानगर, वाकड, हिंजवडी ब्रिज, वडगाव धायरी, सातारा रस्ता आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे इंजिनमध्ये पाणी जाऊन अनेक वाहने बंद पडल्याने कोंडीमध्ये अधिकच भर पडली. रस्त्याच्या खड्ड्यांमुळेही वाहतूक मंदावली होती. कार्यालयातून घरी परतण्याच्या वेळेसच पावसाने हजेरी लावल्याने नोकरदारांचे चांगलेच हाल झाले. अनेकांना घरी पोहोचण्यास दोन तासांचा विलंब लागला.
या पावसाने सखल भागात पाण्याची तळी साचली होती. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. सिंहगड रस्त्याचा तर जणू ओढा झाला होता. लगतच्या अनेक दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरले. कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकात पाण्याचे तळे साचल्याने वाहने चालविणेही मुश्किल झाले.