वारकऱ्यांसाठी मध्यरात्री दारे खुली करणाऱ्या डॉ दानिश खान यांची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 06:25 PM2019-07-12T18:25:06+5:302019-07-12T18:39:55+5:30
जात, धर्माच्या पलीकडे माणुसकी जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सहृदयी व्यक्तीचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे. ही व्यक्ती आहे संगमनेरचे डॉ दानिश खान. प्रेम, बंधुता, संवेनशीलता कमी होत असल्याच्या काळात खान यांनी मात्र पुन्हा एकदा माणुसकीच्या मूल्यांवरचा विश्वास गाढ केला आहे.
पुणे : जात, धर्माच्या पलीकडे माणुसकी जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सहृदयी व्यक्तीचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे. ही व्यक्ती आहे संगमनेरचे डॉ दानिश खान.
रात्री वारकऱ्यांची गाडी बंद पडली असताना त्यांची सोय स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये करणाऱ्या खान यांनी दाखवलेल्या अगत्याने भारावलेल्या एका वारकऱ्यानेच पोस्ट लिहून त्यांचे कौतुक केले आहे. ही पोस्ट सध्या व्हॉट्स ऍपवर व्हायरल झाली आहे. खान हे संगमनेर नगरपरिषेदेचे अपक्ष नगरसेवकही आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पैठणमधून सुमारे चाळीस वारकरी त्यांची दिंडी घेऊन गाडीतून शिर्डी, वणीची देवी असे दर्शन घेऊन देहू आणि आळंदी मार्गे पंढरपूरला निघाले होते. मात्र अचानक त्यांची गाडी रात्री उशिरा संगमनेर येथील जोर्वे नाका रस्त्याजवळ बंद पडली. त्यात महिलांचाही समावेश होता. मात्र गाडीची दुरुस्ती मोठी असल्याने रात्र जाईल असे दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. अनोळखी गाव, अनोळखी माणसे आणि पावसाळी वातावरण अशावेळी राहायचे तरी कुठे असा प्रश्न त्यांना पडला होता. तेव्हा त्यांना एका व्यक्तीने जवळच असलेल्या देवी गल्लीतल्या देवीच्या मंदिराचा पत्ता दिला. तिथे रात्र काढू असा विचार करून मंडळी आली आणि बघितलं तर नेमके त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु असल्याने तिथे मुक्काम करण्यासारखी स्थिती नव्हती.
अखेर वारकरी मंदिराच्या समोर असलेल्या घराच्या आडोशाखाली उभे राहिले. तेवढ्यात समोर असलेल्या सेवा हॉस्पिटलमधून बाहेर येणाऱ्या डॉ खान यांना गर्दी दिसली. सवयीप्रमाणे त्यांनी गर्दीची चौकशी केली तर त्यांना वारकऱ्यांची अडचण समजली. त्यांनी विचार केला आणि वारकऱ्यांना हॉस्पिटलमधील रिकाम्या खाटांवर झोपणार का असे विचारले. वारकऱ्यांनीही होकार दिला. त्यानंतर महिला हॉस्पिटलमध्ये तर पुरुष मंडळी खान यांच्याच स्व.अय्युब खान हॉलमध्ये राहिले. एवढ्यावर खान थांबले नाही तर दुसऱ्या दिवशी त्यांनी वारकऱ्यांना आन्हिके उरकण्याचीही सोय करून दिली. त्यानंतर सेवा फाउंडेशनतर्फे त्यांच्या जेवणाची सोय केली आणि गाडी व्यवस्थित असल्याची खात्री पटल्यावरच पाहुण्यांना निरोप दिला. यावेळी त्यांच्यासोबत काही मुस्लिम बांधवही उपस्थित होते. निरोपाच्यावेळी मात्र या बांधवांनी दाखवलेल्या आपुलकीने वारकरीही भारावून गेले होते.
याबाबत लोकमतशी बोलताना डॉ खान म्हणाले की, 'मी यात काहीही वेगळं केलेलं नाहीये. धर्म आणि जात याच्यापलीकडे ती सर्व माणसं आहेत हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. मला त्यांच्या भक्तीबाबत आदर आहे. त्यामुळे यंदापासून त्यांनी दरवर्षी आमचा पाहुणचार घेऊन, एक मुक्काम संगमनेरला करावा आणि आम्हाला सेवेची संधी द्यावी अशी विनंती मी त्यांना केली'. प्रेम, बंधुता, संवेनशीलता कमी होत असल्याच्या काळात खान यांनी मात्र पुन्हा एकदा माणुसकीच्या मूल्यांवरचा विश्वास गाढ केला आहे.