‘अण्णा भाऊं’ची चित्तरकथा लवकरच पडद्यावर
By admin | Published: August 1, 2015 04:34 AM2015-08-01T04:34:38+5:302015-08-01T04:34:38+5:30
सर्जनशील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पहाडी आवाजानं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जान भरली... पृथ्वी कामगार, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे, असे सांगणाऱ्या अण्णा भाऊ साठे
- धनाजी कांबळे, पुणे
सर्जनशील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पहाडी आवाजानं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जान भरली... पृथ्वी कामगार, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे, असे सांगणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचे जीवनचरित्र आतापर्यंत केवळ पुस्तकांतूनच जगाच्या समोर आलं आहे. मात्र, अण्णा भाऊंच्या जीवनाच्या चित्तरकथेसह त्यांच्या साहित्यिक प्रवाहांची माहिती करून देणारा माहितीपट लवकरच जगाच्या समोर येणार आहे. पुण्यातील तरुण दिग्दर्शक सिद्धार्थ भालेराव यांनी यासाठी कंबर कसली असून, गेल्या अकरा वर्षांपासून ते या विषयावर माहिती-मुलाखती घेण्याचं काम करीत आहेत. आता हे काम अंतिम टप्प्यात आलं असून, अण्णा भाऊ साठे यांच्या पुढच्या जयंतीदिनी माहितीपटाच्या माध्यमातून हा प्रवास रुपेरी पडद्यावर येणार आहे.
मूळचे चित्रकार, शिल्पकार असेलेले सिद्धार्थ भालेराव यांनी अण्णा भाऊ साठे यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर आणण्याचा चंग बांधला आहे. अण्णा भाऊ साठे शाहीर म्हणून जेवढे महान होते... त्याहूनही ते माणूस म्हणून अतिशय संवेदनशील होते... राबणाऱ्या माणसांच्या हातात हात घालून भांडवली व्यवस्थेवर हल्लाबोल करणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचं साहित्यही मोठं होतं... त्याचं विश्लेषण आणि व्यक्तित्व माध्यमातून पुन्हा एकदा जिवंत करण्याचं काम यानिमित्तानं पुण्यात सुरू आहे. साधारण पस्तीस-चाळिशीत असलेल्या सिद्धार्थ भालेराव यांनी यासाठी मुंबईतील अण्णा भाऊंच्या वास्तव्यापासून ते त्यांच्या निर्वाणापर्यंतचा वेध घेतलेला आहे. जीवनप्रवास, साहित्य आणि चित्रपट कथा अशा तीन विभागांत हा माहितीपट विभागला असून, माहितीपटाचे एक-एक तासाचे तीन भाग करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आर. बी. मोरे, पगारे, साळवी यांनी अण्णा भाऊंना लिहितं केलं... शाहीर अमरशेख आणि जयवंताबाई यांनी खऱ्या अर्थानं अण्णा भाऊ साठे यांच्यातला लेखक जागा केला. त्याबद्दलही या माहितीपटात मांडणी केली आहे. वामन ओव्हाळ, अर्जुन डांगळे, डॉ. माधव पोतदार, आत्माराम पाटील यांच्या पत्नी इंद्रायणीबाई, सुबोध मोरे, डॉ. रामनाथ चव्हाण, डॉ. चंद्रकुमार नलगे, अण्णा भाऊ साठे यांची मुलगी शांताबाई दोडके, प्र. बा. ऊर्फ भाऊसाहेब सोनावणे, डॉ. मच्छिंद्र सकटे, डॉ. बाबूराव गुरव, जंगले गुरुजी, डॉ. भारत पाटणकर अशा सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि ज्यांनी अण्णा भाऊ साठे यांना पाहिलेलं आहे, अशा ८० ते १०० जणांच्या मुलाखती या माहितीपटात आहेत. शिवशाहीर राजू राऊत यांनी या माहितीपटात पोवाडे गायिले आहेत.
चित्रपटाचे काम रखडले
महाराष्ट्र शासन अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर चित्रपट तयार करीत आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हे काम रखडल्याने सिद्धार्थ भालेराव यांचा माहितीपट हा एकमेव माहितीपट रूपेरी पडद्यावर उपलब्ध होण्याची वस्तुस्थिती आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या सात कथा-कादंबऱ्यांवर आतापर्यंत विविध चित्रपट तयार झालेले आहेत. मात्र, अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावरील चित्रपट मात्र रखडलेला आहे. आता या चित्रपटाची पुर्निर्मिती करण्याबाबत चर्चा सुरू असून, नोव्हेंबरदरम्यान चित्रपटाचे काम सुरू होणार असल्याचे समजते.