एका 'हटके' लग्नाची गोष्ट! रक्तदानाचं श्रेष्ठ कर्तव्य बजावत वधूवरांनी बांधली रेशीमगाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 09:47 PM2021-05-05T21:47:46+5:302021-05-05T21:50:48+5:30
दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथे पार पडलेल्या लग्नात अ अनोख्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपली गेली...
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लग्नासह सर्वच समारंभांना मर्यादा आल्या आहेत. तरीदेखील काही लग्नसोहळे हे विशेष ठरताहेत. दौंड तालुक्यातील देऊळगाडा येथील लग्न सध्या परिसरात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या लग्नात नवरदेव नवरीने भर मंडपात रक्दान करून समाजासमोर नवा आदर्श घालून दिला आहे.एवढेच नव्हे तर आपल्यासोबत गावातील तरुणांना देखील सहभागी करून घेत रक्तदानाची अनोखी मोहीम देखील राबविली.
दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा गावचे रहिवासी असलेल्या मारूती कोकरे यांचे सुपुत्र अंकुश व माळशिरस तालुक्यातील कुरबावी येथील गोरख रूपनवर यांची कन्या पूनम यांचा लग्नसोहळा मोजक्याच पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.पण काळाची गरज ओळखून नवरदेव मुलाने आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करताना लग्नसमारंभात सामाजिक बांधिलकी जपण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच ही इच्छा अगोदर त्याने आपल्या वडिलांसह कुटुंबासमोर सांगितली. या नेमकं काय करता येईल याचा चोहोबाजूंनी विचारविनिमय केल्यानंतर कुठलाही बडेजाव ना करता साध्या आणि सोप्या लग्नसोहळ्यात रक्तदान शिबीर आयोजित करण्याचं ठरले.
कोरोना संकटामुळे राज्यात ग्रामीण आणि शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा कमतरता भासत आहे.त्यासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक जणांनी नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केले आहे. रक्तदानाची हीच गरज ओळखून पैलवान आणि फार्मसिस्ट असणाऱ्या अंकुशने आपल्या लग्नात सकाळपासूनच रक्तदान शिबिराचे आयोजन केले. तसेच गावातील तरुणांना व कुटुंबातील लोकांना देखील रक्तदानासाठी प्रवृत्त केले. एवढेच नाहीतर त्याने आपल्या लग्नात अक्षतांऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा उपयोग केला. आणि अक्षतांसाठी वापरण्यात येणारा सर्व तांदूळ बारामती तालुक्यातील सुपे येथील विशेष मुलांच्या संस्थेला व दौंड तालुक्यातील गलांडवाडीमधील खाडे बालकाश्रमाला सुपूर्द करण्यात आला. या लग्नसोहळ्याला उपस्थित असणाऱ्या पाहुणे मंडळींना आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आली.
नवरदेव अंकुश म्हणाला,मला माझे लग्न अनेक सामाजिक उपक्रमांनी पार पाडायचे होते. आणि या सगळ्यात माझ्या कुटुंबाची साथ महत्वाची होती. पण कुटुंबाने समाजाचा विचार न करता माझ्या पाठीशी उभे राहिले.एकतर आमच्या धनगर समाजात परंपरेला मोडीत काढणे फार अवघड गोष्ट आहे. मात्र कुटुंब पाठीशी असल्याने मी निश्चिन्त होतो. त्याचवेळी समाजातील रक्ताच्या तुटवड्याच्या बातम्या कानावर येत होत्या. त्यामुळे लग्नात देखील रक्तदानाची मोहीम राबविण्याचे ठरवले. हा उपक्रम सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झाले.
........
प्री वेडिंगसाठी आयडियाची कल्पना
अलिकडे प्री वेडिंग फोटोशूट या नवीन संकल्पनेचा सर्वत्र बोलबाला आहे. यासाठी अनेकजण अप्रतिम ठिकाणे निवडतात. मात्र अंकुश आणि पूनम यांनी सगळ्याला फाटा देत आपले प्री वेडिंग फोटोशूटसाठी हटके आयडियाची कल्पना वापरली. यात त्यांनी धनगर समाजाच्या परंपरागत वेशभूषेत आणि
मेंढरांसमवेत प्री वेडिंग फोटोशूट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.