Marathi Bhasha Din :मराठी टिकवण्यासाठी आयुष्यचं मराठीमय झालेल्या 'मराठीकाकां'च्या लढाईची गोष्ट !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 03:13 PM2020-02-27T15:13:47+5:302020-02-27T15:55:50+5:30
भाषा टिकली पाहिजे असे फक्त तोंडी न म्हणता त्यासाठी आवश्यक ती कृती करणारे मराठीकाका वेगळे ठरतात. आज त्यांना राज्य मराठी विकास संस्थेचा मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पुणे : माणसाला एखाद्या ध्यासाने झपाटलं की कोणी कितीही प्रयत्न केला तरी तो त्यापासून दूर होत नाही. मराठी भाषा टिकवण्याच्या वेडाने झपाटलेले मराठी काका उर्फ अनिल गोरे यांचीही कहाणी अशीच काहीशी आहे. गणितात पदवी घेतलेल्या गोरे यांनी साधारण २० वर्षांपासून भाषेसाठी काम सुरु केले. त्यांच्या या कामामुळे दूरध्वनीवर, सरकारी कार्यालये आणि बँकामध्ये मराठी वापरण्यास सुरुवात झाली आहे. भाषा टिकली पाहिजे असे फक्त तोंडी न म्हणता त्यासाठी आवश्यक ती कृती करणारे मराठीकाका वेगळे ठरतात ते याच मुळे. आज त्यांना राज्य मराठी विकास संस्थेचा मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
ज्यावेळी घरी असणारे फोन (लँडलाईन) हाच पर्याय होता त्या काळातली गोष्ट. मोबाईल, इंटरनेटच्या वेडाने लोकांना झपाटण्याआधीचे हे दिवस होते. याच काळात गोरे यांचा व्यवसायानिमित्त भारतभर संबंध यायचा. गुजरात असो किंवा कर्नाटक,तिथे फक्त त्या-त्या राज्यांच्या बोलीभाषेत फोन व्यस्त असल्याचा संदेश ऐकू यायचा. अपवाद फक्त महाराष्ट्राचा. इथे मात्र हिंदी आणि इंग्रजी संदेश ऐकू यायचा. अखेर गोरे यांनी थेट दूरसंचार कार्यालयात धाव घेतली. पत्र दिले, पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यशही आले. आज मराठीत ऐकू येत असणारे संदेश ही त्यांचीच कमाई आहे. जी गोष्ट दूरध्वनीची तीच बँकांचीसुद्धा. आपल्याकडे बँकांचे व्यवहार उगीचच इंग्रजीत करण्याचा गैरसमज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. याही ठिकाणी पुन्हा एकदा शांतपणे लढा देत त्यांनी बँकांना मराठी अर्ज ठेवण्यास भाग पाडले. इतकेच नाही तर मराठीत पासबुक भरून घेणेही सुरु केले. त्यांचे बघून आज अनेकजण बँकांचे व्यवहार मराठीत करतात.
हे सर्व झाले कार्यालयीन व्यवहारांचे. पण जोवर विद्यार्थ्यांचे, नव्या पिढीचे मराठीशी नाते जुळत नाही तोवर भाषा टिकणे कठीण आहे असे त्यांचे ठाम मत आहे. त्यामुळे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र या विज्ञान शाखांच्या पुस्तकांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. इतकेच नव्हे तर बोर्डाला दखल घेऊन हे विषय मराठीत परीक्षा देण्यासाठी उपलब्ध केले. रेल्वेच्या महाराष्ट्रासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षाही मराठीत देता याव्यात यासाठी त्यांनी लढा दिला. तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांची दखल घेत परीक्षार्थींना मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिला. मराठी भाषेच्या उद्धरासाठी काम करणाऱ्या गोरे यांचे आयुष्य जणू मराठीमय झाले आहे, आज त्यांना 'मराठी काका' म्हणून ओळखले जाते ते साठीच.