शिवसेना कार्यालयाची कथा, आव्वाज...कुठूनही, कसाही आणि केव्हाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 11:47 PM2019-03-30T23:47:16+5:302019-03-30T23:47:35+5:30
राजकीय वास्तू
‘रस्त्यावरचा संघर्ष म्हणजे शिवसेना’ ही ओळखच शिवसेनेला पुण्यात सुरुवात झाल्यानंतरही अनेक वर्षे रस्त्यावरच ठेवून होती. ‘कार्यालय’ असे शिवसेनेला नव्हतेच. नेत्याचे घर किंवा ते उपलब्ध नसेल तर रस्त्यावरच चटईचे किंवा फार झाले तर कच्च्या विटांचे बुरूज बांधून केलेली शाखा हेच शिवसेनेचे कार्यालय! मुंबईत शिवसेना भवन बांधून झाल्यानंतरही कित्येक वर्षे पुण्यातील शिवसेनेला कार्यालय असे नव्हतेच. उपमहापौर असताना सर्वप्रथम म्हणजे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी डेक्कन या मध्यवर्ती परिसरात ‘शिवसेना भवन’ करून दिले.
शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय म्हणजे कसबा पेठेतील काका वडके व नंदू घाटे यांची घरे. आंदोलनाचे सगळे काही तिथेच ठरायचे. बैठकाही तिथेच व्हायच्या. त्याही शिवसेना स्टाईलने. म्हणजे शिवसैनिक वगळता कोणालाही त्याची माहिती नसायची. तिथे गुप्त बैठकीत सगळे ठरून दुसऱ्या दिवशी थेट आंदोलनच व्हायचे. शिवसेनेच्या शाखांचीही एक वेगळी ओळख होती. एक तर त्या रस्त्यावरच पदपथाच्या कडेला असायच्या. भगव्या रंगात रंगवलेले चटईचे आडोसे, बाहेरच्या बाजूला मध्यभागी महाराष्ट्राच्या नकाशात रंगवलेला वाघ असलेला मोठा काळा फळा असायच्या. त्यावर रोज सुुुविचार किंवा मग मार्मिकमधील बाळासाहेब ठाकरे यांचे संपादकीय किंवा व्यंगचित्र रंगवलेले असायचे.
या शाखा म्हणजेच शिवसेनेची कार्यालये. ती अनधिकृत आहेत, पाडायला हवी असा ओरडा शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनानंतर व्हायचा. पालिकेचे अधिकारीही त्याला दुजोरा देत, कारवाई करू म्हणू सांगत व काही दिवसांनी सगळे प्रकरण गार होत असे. याचे कारण तेव्हा पालिकेत असलेले शिवसेनेचे नगरसेवक असत. कारवाई करू म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांना ते खास शिवसेनेच्या पद्धतीने कचाट्यात पकडत व त्यानंतर कारवाईमधील का सुद्धा कोणी अधिकारी काढत नसे.
मध्यंतरीच्या काळात सत्ताकेंद्र बदलली. शशिकांत सुतार यांचा दबदबा वाढला. ते कोथरूडचे. त्यामुळे शिवसेनेचे सत्ताकेंद्र कोथरूडला गेले. सुतारांना भाऊ म्हणतात. त्यांनी पुण्यात शाखा वाढवल्या. कोथरूडमध्येही त्यांची संख्या वाढली. सर्वाधिक वेगाने वाढलेले उपनगर हा कोथरूडचा लौकिक तो शिवसेनेचा बालेकिल्ला असाही झाला. कोथरूडमधील सुतार यांचे संपर्क कार्यालय म्हणजेच मध्यवर्ती कार्यालय असे झाले. नंतरच्या काळात युतीची सत्ता आली. भाऊ मंत्री झाले, त्यामुळे शिवसेनेचे वजनही वाढले. रस्त्यावरच्या शाखांचा जोरही वाढला. ती कार्यालये पूर्वीपेक्षा चकचकीत झाली. काही शाखा म्हणजे तर बुरूजबंद किल्ले झाले.
दरम्यानच्या काळात सुतारांना चार पावले मागे यायला लागले. विनायक निम्हण आमदार झाले, त्यांच्याकडे शहरप्रमुखपद आले. पुन्हा एकदा शिवसेनेचे सत्ताकेंद्र बदलले. मग निम्हणही काँग्रेसवासी झाले. दरम्यानच्या काळात चंद्रकांत मोकाटे नगरसेवक झाले, उपमहापौर झाले, त्यांनी शिवसेनेला मध्यवर्ती कार्यालय दिले. त्यानंतर तेही आमदार झाले. डेक्कनसारख्या ठिकाणी एका इमारतीत चांगल्या सदनिकेत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय अशी कागदोपत्री नोंद झाली. आमदारकी गेल्यावर मोकाटे व महादेव बाबर यांच्याकडे आता शहरप्रमुखपदाची जबाबदारी आहे. सध्या शिवसेनेचे कामकाज याच मध्यवर्ती कार्यालयातून चालते. बैठका वगैरे तिथेच होतात. ती जागा बदलून आता आणखी मोठे शिवसेना भवन बांधायचे आहे. ते रस्त्याच्या कडेला असेल असे मोकाटे सांगतात. ‘रस्त्यावर संघर्ष करणारी’ ही ओळख त्यांना त्या कार्यालयातून कायम ठेवायची आहे.
(शब्दांकन : राजू इनामदार)