गुरूचा 'जावई' होण्याचा मिळाला बहुमान; कुस्तीपटू राहुल आवारे अडकला विवाहबंधनात
By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: January 5, 2021 12:50 PM2021-01-05T12:50:15+5:302021-01-05T12:51:37+5:30
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांची मुलगी ऐश्वर्या व पाटोद्याचा कुस्तीपटू व डीवायएसपी राहुल आवारे यांचा ९ ऑक्टोबर रोजी साखरपुडा झाला होता..
पुणे : सर्वत्र लग्नाचा हंगाम सुरु आहे. यामध्ये प्रत्येकाचा आपले लग्न चर्चेचा विषय कसा ठरेल यासाठी धडपड सुरु असते. त्यात मग 'हटके' फंडे वापरल्याने काही लग्नांची तुफान चर्चा देखील सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळते. पण पुण्यात एक लग्न खास आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरले. या नयनरम्य विवाह सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध राजकीय नेतेमंडळींसह अनेकांनी दिग्गजांनी हजेरी लावत वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. हा लग्न सोहळा विशेष आकर्षण यासाठी होता की आपल्याच गुरूचा जावई होण्याचा मान एका शिष्याने मिळवला आहे.
कुस्तीचे मैदान मारण्यासाठी एकाहून एक सरस कुस्तीपटू तयार करणाऱ्या काका पवार यांची मुलगी ऐश्वर्या व पाटोद्याचा कुस्तीपटू व पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्त झालेल्या राहुल आवारे यांचा गेल्या ९ ऑक्टोबर रोजी साखरपुडा झाला होता. पुण्यात रविवारी ( दि. ३ ) या जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. साखरपुडा झाल्यापासूनच हे राहुल आणि ऐश्वर्या जोडपे हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.
कुस्तीच्या खेळातून भारताचा डंका साता समुद्रापार वाजवताना ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केलेला राहुल आवारे हा पाटोद्याच्या बाळासाहेब आवारे यांचा सुपुत्र व अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांचा शिष्य आहे. या कामगिरीनंतर राहुलची गृह विभागाने थेट डीवायएसपी या पदावर नियुक्ती केली आहे. राहुल आणि ऐश्वर्या हे रविवारी मोठ्या धुमधडाक्यात पुण्यात पार पडलेल्या विवाह सोहळ्यात एकमेकांचे आयुष्यभरासाठी साथीदार झाले. या निमित्ताने आपल्याच गुरूचा 'जावई' होण्याचा मान राहुल याला मिळाला.
तापट मुलगा ते उत्तम कुस्तीपटू असा राहुलचा थक्क करणारा प्रवास....
बीड जिल्ह्यातील पाटोद्याच्या राहुल आवारेने जागतिक पातळीवर कुस्ती स्पर्धेत देशाचे नाव लौकिक करताना आपली दैदिप्यमान कारकीर्द घडविली आहे. परंतू, बालपणी तो उनाडक्या करणारा आणि दंगाखोर होता. त्याच्या तापट स्वभावामुळे वडील बाळासाहेब यांनी त्याला कुस्तीकडे वळविले. एक तापट मुलगा ते उत्तम कुस्तीपटू आणि नंतर डीवायएसपी असा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. आतापर्यंत राहुलने २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले तर २००९ व २०११ च्या आशियाई स्पर्धेत तो ब्राँझ पदकाचा मानकरी ठरला. राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने पाचवेळा सुवर्णपदक जिंकले. जागतिक कुस्ती स्पर्धेत फ्री स्टाइल खेळणाऱ्या राहुलने मराठी पताका फडकविली.