सर्वस्पर्शी प्रतिभांचा कथाविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:11 AM2021-04-22T04:11:37+5:302021-04-22T04:11:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गतवर्षी लॉकडाऊनमध्ये घरीच अडकलेली अधिकांश मंडळी सोशल मीडिया आणि तेच तेच फॉरवर्ड मेसेज वाचून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गतवर्षी लॉकडाऊनमध्ये घरीच अडकलेली अधिकांश मंडळी सोशल मीडिया आणि तेच तेच फॉरवर्ड मेसेज वाचून किंवा पोस्ट शेअर करून अक्षरश: कंटाळली होती. त्यातच ग्रंथालयं... पुस्तक दालनं देखील बंद. मग अशा मंडळींना वाचनासाठी उत्तम खाद्य देण्याकरिता व्हॉट्सअपवर एक ग्रुप साकार झाला अन् राज्यभरातील कथाकार या ग्रुपद्वारे एकत्र आले. या कथाकारांनी आपल्या कथा शेअर केल्या आणि पाहता पाहता या कथांना राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळू लागला... यातील कुणालाही कधी वाटलं देखील नाही की याचं कधी पुस्तक आकाराला येईल. पण एका व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे सुरू झालेला कथाकारांचा हा अनोखा प्रवास कथासंग्रहाच्या रूपाने आता वाचकांसमोर येत आहे. ‘सर्वस्पर्शी प्रतिभांचा कथाविष्कार’ असे या कथासंग्रहाचे नाव असून, या माध्यमातून कथाकारांच्या वैविध्यपूर्ण कथांचे विश्व अनुभवायला मिळणार आहे.
ग्रामीण कथालेखक बबन पोतदार यांनी लॉकडाऊनकाळात हा अभिनव प्रयोग साकार केला अन् तो पुस्तकरूपात परिवर्तित झाला. अस्सल गावरान भाषेचा तडका तोही एकदम झणझणीत असा या कथांमधून वाचकांना चाखायला मिळणार आहे. पोतदार यांनी या प्रयोगाविषयी ‘लोकमत’ला सांगितले की, गेल्या वर्षी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून राज्यभरातील कथाकारांना एकत्र आणले.
सुरुवातीला रोज एका कथाकाराची कसदार कथा शेअर करीत असे. त्या कथेसोबत कथाकाराचा परिचय आणि कथेमागील बीज याचाही समावेश असायचा. या कथेवर पुढे आठवडाभर चर्चा रंगू लागली. एका कथाकारांच्या लेखनावर कसलेल्या साहित्यिकांकडून परीक्षणही होऊ लागले. या गटामध्ये देशातील विशेषत: महाराष्ट्रातील आणि बेळगाव सीमा भागातील विविध भागांत नोकरी, उद्योग करणाऱ्या लेखकांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक लेखनात त्या भागातील प्रादेशिकता, वेगळ्या चालीरीती, तेथील परंपरा, भाषेचा लहेजा उतरलेला असायचा. कथेतील गोडवा अनुभवायला मिळाल्याने वाचकांची अनुभवसंपन्नता अधिक रूंदावत गेली. पुढे याच २०० हून अधिक असणाऱ्या गट सदस्यांमधून निवडक कथांचा संग्रह प्रकाशित करण्याची संकल्पना पुढे आली आणि तिने मूर्त स्वरूपही धारण केले. या कथासंग्रहात माझ्यासह सुनील वेदपाठक, लक्ष्मीकमल गेडाम, संध्या धर्माधिकारी, राजेंद्र भोसले, मंगला बक्षी, वंदना धर्माधिकारी, अजित काटकर, सुवर्णा मस्कर, प्रशांत सातपुते आदी २० कथाकारांच्या कथांचा समावेश आहे. साहित्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची १६ पानांची प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे.