नवले पुलाजवळ विचित्र अपघात, आठ ते नऊ वाहनांची धडक; वाहतूक विभागाच्या सुचनांकडे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 11:34 AM2024-02-24T11:34:24+5:302024-02-24T11:35:19+5:30
या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली...
- कल्याणराव आवताडे
धायरी(पुणे) : ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात घडला आहे. या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असले तरी यातील वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजकडून (देहू रस्ता) नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा विचित्र अपघात घडला. या महामार्गावर एका ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर थांबलेल्या वाहनाला धडक दिली. त्यामुळे विचित्र अपघात घडत आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला केली. तसेच जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वाहतूक विभागाने केलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष...
नवले पुल चौकातून राष्ट्रीय महामार्ग ६५ व ४८ वरील सर्व्हिस रस्ते जोडले जातात. कात्रज चौक ते नवले पुल हा रस्ता सहा पदरी असून तीव्र उताराचा आहे. नवले चौकात येणारी वाहने वेगात येतात. त्यामुळे बऱ्याच वेळेस सिग्नलला उभे असलेल्या वाहनावर वेग नियंत्रित न झाल्यामुळे ब्रेक न लागल्याने जड वाहनांकडून सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनांना धडक देऊन गंभीर अपघाताचे प्रकार याआधी घडलेले आहेत. नवले पुलास प्राप्त झालेल्या भौगोलिक उतारामुळे व घडलेल्या अपघातांच्या उपाय योजनेच्या दृष्टीकोनातून खालील उपाय करणे गरजेचे असल्याचे पत्र वाहतूक विभागाचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे दिले होते. मात्र अद्यापपर्यंत त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.
Pune: नवले पुलाजवळ विचित्र अपघात, आठ ते नऊ वाहनांची धडक#Punepic.twitter.com/UT34XHcHwO
— Lokmat (@lokmat) February 24, 2024
ह्या उपाययोजना करणे आवश्यक...
१. नवले पुल चौकात आयआरसी नॉर्मप्रमाणे गतिरोधक बसविण्यात यावा, त्यामुळे वाहनाचा वेग कमी होईल.
२. कात्रज ते नवले पुल रस्त्यावर नवले पुल चौकापासून २०० मीटर अलीकडे बाबजी पेट्रोल पंपासमोर व १०० मीटर अलीकडे रम्बलर्स स्ट्रीप्स आखण्यात यावेत. तसेच याठिकाणी सोलार रेड ब्लीकर्स बसविण्यात यावेत.