पुणे: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांकडून अजबगजब राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 09:36 AM2021-12-03T09:36:08+5:302021-12-03T09:37:58+5:30
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक चांगलीच तापली आहे. नवीन सहकार कायद्याचा गैरफायदा घेत बहुतेक दिग्गज संचालकांनी ...
पुणे :पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचीनिवडणूक चांगलीच तापली आहे. नवीन सहकार कायद्याचा गैरफायदा घेत बहुतेक दिग्गज संचालकांनी अजबगजब राजकारण सुरू केले आहे. सहकारात एका उमेदवाराने किती अर्ज दाखल करावेत याचे बंधन नसल्याने प्रस्थापित उमेदवारांकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराला सूचक मिळू नये म्हणून यासाठी जास्तीत जास्त अर्ज दाखल करण्याचा नवा फंडा सुरू झाला आहे. यामुळे एकाच उमेदवाराने चक्क एकावन्न उमेदवारी अर्ज विकत घेतले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था किंवा लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज भरता येतात; परंतु सहकारी संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. त्याचा गैरवापर उमेदवार करू लागले आहेत.
गेल्या तीन दिवसांत जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक व माजी उपाध्यक्ष संजय काळे यांनी सात उमेदवारी अर्ज दाखल केले. विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्येकी चार अर्ज दाखल केले. विविध कार्यकारी सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून प्रत्येक तालुक्यात एक जागा आहे. या गटामध्ये तालुक्यात मतदारांची संख्या ४० ते १०० च्या दरम्यान आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराला सूचक मिळू नये म्हणून प्रस्थापित उमेदवार हे प्रतिस्पर्धी उमेदवाराला मिळतील अशा मतदारांचा शोध घेऊन त्यांच्याकडून सूचक म्हणून स्वतःच्या उमेदवारी अर्जावर सह्या घेत आहेत. दोन उमेदवारांना एकानेच सूचक म्हणून सही दिल्यास त्यांचे उमेदवारी अर्ज बाद होतात. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज भरून सूचक अडकवून ठेवण्याचा प्रकार सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.