पुढच्या आठवड्यात ठरणार विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना- हर्षवर्धन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 04:45 PM2024-06-11T16:45:08+5:302024-06-11T16:45:36+5:30

विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना ठरेल, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष पाटील यांनी आज त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली...

Strategy for next week's assembly elections bjp leader Harshvardhan Patil pune | पुढच्या आठवड्यात ठरणार विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना- हर्षवर्धन पाटील

पुढच्या आठवड्यात ठरणार विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना- हर्षवर्धन पाटील

इंदापूर (पुणे) : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात व विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघात अपेक्षित यश मिळाले नसल्याची खंत आहे. पुढच्या आठवड्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधन केंद्रात राज्यातील निवडक २१ कार्यकर्त्यांच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अपयशाची कारणमीमांसा शोधली जाईल. विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना ठरेल, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष पाटील यांनी आज त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार, ॲड. मनोहर चौधरी, मारुतराव वणवे, बाबा महाराज खारतोडे, ॲड. अशोक कोठारी, राजकुमार जाधव, वाहतूक संघाचे अध्यक्ष रघुनाथ राऊत, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपला देशात चांगला कौल मिळाला. महाराष्ट्र विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे घटक म्हणून आमची जी भूमिका होती, ती मी व आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत चांगल्या पद्धतीने पार पाडली. मात्र, यश मिळाले नाही. शेवटी जनता श्रेष्ठ आहे. तिने दिलेला कौल मान्यच करावा लागतो. कुठे काय चुकले, याबाबत ज्या त्या पक्षांच्या स्तरावर विचारविनिमय होईल. इंदापूर तालुक्यात पक्ष पातळीवर बैठक घेतली जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.

केंद्र शासनाच्या सहकार्याने व आर्थिक मदतीने इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे सिंचन, उद्योग, रेल्वेचे दळणवळण हे प्रश्न केंद्राकडून सोडवून घ्यावे लागतील. मच्छीमारी, दुग्ध व्यवसाय, मुद्रा योजना, प्रक्रिया उद्योग अशा केंद्राच्या विविध योजना आणि केंद्र शासनाच्या योजना आणण्यासाठी माझा पुढाकार राहील, अशी हमी पाटील यांनी दिली.

१४ जून रोजी पुण्यात दिल्ली येथील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साखर उद्योगाबाबत बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत शंभर दिवसांचा कार्यक्रम आखण्याची सूचना प्रशासनास दिली आहे. या कार्यक्रमात सहकार, अर्थ, वाणिज्य, कृषी व प्रक्रिया उद्योग या महत्त्वाच्या खात्यांशी संबंधित असणाऱ्या साखर उद्योगाचा समावेश होण्याबाबत आपला प्रयत्न आहे. कारण, साखर उद्योगाचा त्या कार्यक्रमात समावेश झाला तर त्याचा मोठा फायदा पुढच्या दहा वर्षांत या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या वर्गास होईल. धोरण तयार होईल. अमित शाह यांच्याकडे सहकार खाते आहेच. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केंद्रीय सहकार खात्याचे राज्यमंत्रिपद दिल्याचा फायदा होईल, असे पाटील म्हणाले.

दूध दराबाबत दुग्धविकास मंत्र्यांशी चर्चा

उसाप्रमाणे दुधालाही एफआरपी दिली जावी. दुधाला प्रतिलिटर ३५ रुपये दर असलाच पाहिजे. पाच रुपयांचे अनुदानही मिळावे, अशी मागणी आपण दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. दुष्काळी स्थिती व संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर समाधानकारक पाऊस पडेपर्यंत टँकर बंद करू नयेत, अशी सूचना आपण प्रशासनास दिली आहे. बियाणे, खतांची मुबलक उपलब्धता करून देण्याचीही सूचना संबंधित विभागास दिली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

Web Title: Strategy for next week's assembly elections bjp leader Harshvardhan Patil pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.