संगीतशिक्षणाचे धोरण ठरविले पाहिजे, डॉ. प्रभा अत्रे यांची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 03:37 AM2018-04-20T03:37:14+5:302018-04-20T03:37:14+5:30
आज संगीतशास्त्र आणि कलाविष्कार यांच्यातील अंतर वाढत चालले आहे. काळानुसार संगीत कलाविष्काराचे सादरीकरण बदलत आहे. मात्र, शास्त्र हे प्राचीन ग्रंथातच अडकून पडले आहे. कोणत्याही कलेला वर्तमानाचा संबंध लावता आला पाहिजे, तर ती परंपरा टिकते आणि सशक्त बनते.
पुणे : आज संगीतशास्त्र आणि कलाविष्कार यांच्यातील अंतर वाढत चालले आहे. काळानुसार संगीत कलाविष्काराचे सादरीकरण बदलत आहे. मात्र, शास्त्र हे प्राचीन ग्रंथातच अडकून पडले आहे. कोणत्याही कलेला वर्तमानाचा संबंध लावता आला पाहिजे, तर ती परंपरा टिकते आणि सशक्त बनते. मात्र, आपल्याकडे संगीताचा सर्वांगीण विचारच झालेला नाही, अशी खंत व्यक्त करून ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी शिक्षण, सांस्कृतिक संस्था आणि शासन यांनी एकत्र येऊन संगीतशिक्षणाचे धोरण ठरविले पाहिजे, शिक्षण हे उपजीविकेचे साधन बनले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ या दिग्गजांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. एक लाख रुपये रोख आणि बालशिवाजींची सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिमा, पुण्याच्या ग्रामदेवतांसह असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कारार्थी प्रभा अत्रे यांना गौरविण्यात आले. या पुरस्काराबरोबर ६ स्वातंत्र्यसैनिकांना, कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या सैनिकांना आणि वीरपत्नींना भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये रघुनाथ गंगाराम लकेश्री, फुरबू रिंडॉल, संदीप बाजीराव उकिरडे, श्रीमती विनिता अशोक कामटे (कै. अशोक कामटे यांच्या वीरपत्नी), दीनदयाळ वर्मा, प्रल्हाद कृष्णराव रेभे यांचा समावेश होता.
या प्रसंगी व्यासपीठावर महापौर मुक्ता टिळक, उद्योजक गजेंद्र पवार हे उपस्थित होते.
श्रोत्यांनीच मला घडविले. श्रोत्यांविना कलाकार म्हणजे पाण्याविन मासा असतो. मी श्रोत्यांची शतश: ॠणी आहे, अशी भावना व्यक्त करून डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या, की आजच्या कलाविष्काराला सामावून घेणारे शास्त्र निर्माण होण्याची गरज आहे. याच भूमिकेतून प्रस्तुतीकरणाचा नव्याने विचार केला आहे. नियमांच्या चौकटीत राहून उत्तम प्रस्तुतीकरण करणे, हाच संगीताचा एक निकष असायला हवा. श्रोता म्हणून या गोष्टी कलाकाराला माहीत असल्या पाहिजेत. जाणता श्रोताच कलाकारावर अंकुश ठेवू शकतो. रागनिर्मितीसाठी ज्या नियमांचा आधार घेतला जातो, त्यामध्ये एकवाक्यता हवी.
बंदिशीच्या अंतऱ्याशिवाय ख्यालाची उत्तमपणे प्रस्तुती होत असेल, तर अंतºयाचा आग्रह
धरता कामा नये. रागसमय, रागरस या संकल्पनांना विज्ञानाच्या पातळीतून तपासणे आवश्यक
आहे. निर्मितिप्रक्रियेत ज्या-ज्या व्यक्तींचा सहभाग आहे,
त्यांच्यासाठी शिक्षणाची सोय झाली पाहिजे.
अमजद अली खाँ म्हणाले, ‘‘सर्व देशवासीयांना प्रभा अत्रे यांनी गायकीतून आनंद दिला आहे .किराणा घराण्यातील प्रत्येकाने स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवले आहे. ख्याल-ठुमरी दोन्हींवर प्रभा अत्रे यांचे प्रभुत्व आहे. संगीतक्षेत्रातील दिग्गज एकत्र येऊन संगीतक्षेत्रातील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्याची ही पहिलीच वेळ आहे.’’
डॉ. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘अत्रे घराण्याचा बहुआयामी, बंडखोर असण्याचा संबंध आहे, असे प्रभातार्इंकडे पाहून वाटले. संगीताचा व्यामिश्र विचार प्रभाताई मांडतात, मैफली गाजवतात. संगीताने त्यांचे मन विशाल बनले आहे.’’
डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले. नीरजा आपटे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश धर्मावत यांनी आभार मानले.
डॉ. प्रभा अत्रे बदलल्या नाहीत
मी आणि प्रभा अत्रे यांनी जम्मू रेडिओवर एकत्र काम केले आहे. एका बिंदूपासून सुरुवात करून प्रभा अत्रे आता समुद्र बनल्या आहेत. नाव झाल्यावर अनेक कलाकारांचे वर्तन बदलते; पण डॉ. प्रभा अत्रे बदलल्या नाहीत. त्या अद्भुत गायिका आहेतच; पण चिंतनशील तज्ज्ञदेखील आहेत. त्यांच्या वयाच्या शतकपूर्तींचाही असाच दिमाखदार सोहळा व्हावा, असे पं. शिवकुमार शर्मा म्हणाले.
पुढील जन्म महाराष्ट्रात व्हावा
प्रभा अत्रे यांचा खूप जुना परिचय आहे. तेव्हापासून मी त्यांचे अनुकरण करीत आलो आहे. अत्रे या खूपच गुणी कलाकार आहेत. आजचा सोहळा पाहून असे वाटले, की हाच खराखुरा कलाकाराचा सन्मान आहे. मला का नाही मिळाला हा सन्मान? असा लडिवाळपणे राग व्यक्त करून पुढील जन्म महाराष्ट्रात व्हावा, इथल्या मातीत संगीताचा सुगंध आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.