आगामी महापालिकेच्या निवडणूकीसाठी काय आहे महाविकास आघाडीची रणनीती?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 08:50 AM2022-05-27T08:50:43+5:302022-05-27T08:53:08+5:30
पाच वर्षांच्या सत्तेतील कामकाजाची श्वेतपत्रिका काढण्याची मविआची मागणी
- राजू इनामदार
पुणे : लवकरच होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला नामोहरम करण्यासाठी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून त्यांना अडचणीत आणण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. महापालिकेतील पाच वर्षांच्या सत्तेतील कामकाजाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करीत लवकरच आघाडीकडून शहरात महामोर्चाचे आयोजन केल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसने यासाठी पुढाकार घेतला आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे संजय मोरे व काँग्रेसचे रमेश बागवे यांच्यात निवडणुकीच्या अनुषंगाने एक प्राथमिक बैठक झाली असल्याची माहिती समजली. त्यात जगताप यांनी आघाडी होवो अथवा न होवो, तो निर्णय वरिष्ठ घेतील, आपल्याला निवडणूक तर भाजपाच्याच विरोधात लढायची आहे ना, असा मुद्दा उपस्थित केला. तसे असेल तर लवकरच येणार असलेल्या निवडणुकीची तयारी आतापासूनच करावी लागेल, त्यादृष्टीने महामोर्चा काढावा, असे जगताप यांनी सुचविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोरोना काळात महापालिकेने ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा खर्च केला आहे. त्याशिवाय पाच वर्षांत नगरसेवकांच्या यादीतूनही कोट्यवधी रुपयांची कामे झाल्याचे सांगण्यात येते व ती कामे शहरात दिसत मात्र नाहीत. मोठमोठ्या प्रकल्पांवरही काही कोटी रुपये खर्च केले गेले आहेत व ते प्रकल्प अजूनही कागदावरच आहेत. त्यात प्रामुख्याने समान पाणी योजनेचा समावेश आहे. त्यामुळेच पाच वर्षांच्या कामाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी करीत एकत्रित महामोर्चा काढला तर त्यातून चांगले वातावरण होईल, असा अंदाज तिन्ही पक्षप्रमुखांच्या बैठकीत व्यक्त केला गेला असल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात लवकरच काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत दुसऱ्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
सध्या वेगवेगळ्या आंदोलनाच्या निमित्ताने आम्हा तिन्ही शहराध्यक्षांची बैठक होतच असते. निवडणुकीच्या अनुषंगाने आमची चर्चा सुरू आहेच. समान कार्यक्रम ठरवून त्यानुसार नियोजन केले जावे, असे माझे म्हणणे मी अशाच एका बैठकीत मांडले. त्यातून महामोर्चाची कल्पना पुढे आली आहे. त्यावर काम सुरू आहे.
- प्रशांत जगताप- शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस