भटक्या जनावरांनाही मिळणार उपचार; पुणे महापालिका उभारणार प्राण्यांचे हॉस्पिटल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 01:56 PM2022-09-20T13:56:26+5:302022-09-20T13:57:46+5:30
मिशन पॉसिबल संस्थेला या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाचे काम देण्यात येणार
पुणे : शहरातील प्राण्यांवर उपचार करण्यासाठी महापालिका हडपसर येथे स्वत:चे प्राण्यांचे हॉस्पिटल उभारणार आहे. मिशन पॉसिबल संस्थेला या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाचे काम देण्यात येणार असून, या संस्थेसोबत महापालिका ३० वर्षांचा करार करणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
शहरात सुमारे दीड लाख भटके श्वान असून, त्यांच्यासह इतर पाळीव प्राणीही आहेत. महापालिकेत नव्याने ३४ गावे समाविष्ट झाल्याने तेथील भटके श्वान आणि मोकाट जनावरांचा भार महापालिकेवर आला आहे. महापालिकेने या श्वानांची नसबंदी करण्यासाठी चार संस्थांची नियुक्ती केली असली, तरी अजून पूर्ण क्षमतेने त्यांचे काम सुरू झालेले नाही.
शहरात रोज किमान १५ ते २० श्वान अपघातामध्ये जखमी झाल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येतात, पण महापालिकेचे प्राण्यांचे रुग्णालय नसल्याने त्यांच्यावर उपचार करता येत नाहीत. त्यामुळे प्राण्यांच्या रुग्णालयाची शहरात आवश्यकता होती. शहरातील भटक्या श्वानांचा वा मोकाट जनावरांचा अपघात झाल्यास पालिकेच्या श्वान बंदोबस्त गाड्यांमधून कोणत्याही वेळी मोफत उपचारासाठी या नव्याने तयार होणाऱ्या हॉस्पिटलमध्ये घेणे बंधनकारक राहणार आहे. तसेच या श्वानांच्या मोफत उपचारासाठी २० केनेल्स राखीव ठेवणे, उपचारासाठी दाखल असलेल्या श्वानांची/प्राण्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करणे आणि यासाठी कोणतीही फी न आकारणे हे मिशन पॉसिबल या संस्थेला बंधनकारक राहणार आहे.