भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला ; पुण्यातल्या धानाेरी भागातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 11:07 AM2019-09-24T11:07:35+5:302019-09-24T11:10:33+5:30
पुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रविवारी भटक्या कुत्र्यांनी एका चिमुकल्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
धानाेरी : नऊ वर्षांच्या चिमुकल्याला तीन भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. धानोरी येथील पॅलेडियम सोसायटीतील योहान शैलेश नाईक हा चिमुकला भटक्या कुत्र्यांच्या हल्यात जखमी झाला.या गंभीर घटनेनंतर त्याच्या पालकांनी केलेल्या तक्रारी नंतर महानगरपालिका प्रशासनाने पाच भटकी कुत्री पकडून नेली.तर आणखी वीस ते पंचवीस भटक्या कुत्र्यांचा वावर अजूनही त्या परिसरात असून तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
रविवारी दुपारी योहान सोसायटीतील मोकळ्या जागेत मित्रांसोबत खेळत होता. अचानक तीन भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या मांडीला कुत्र्यांनी दोन ठिकाणी चावे घेतले. तर अचानक झालेल्या या हल्यात खाली पडल्यामुळे त्याला चांगलाच मुका मार देखील लागला. त्याच्या पालकांनी त्याला तात्काळ खाजगी रूग्णालयात नेऊन उपचार केले. या घटनेमुळे चिमुकल्या योहानसह सोसायटीतील इतर लहान मुले व नागरिक देखील धास्तावले आहेत.या प्रकरणी त्याच्या पालकांनी सोमवारी महानगरपालिका प्रशासनाला लेखी तक्रार देऊन भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी केली. त्यानुसार तात्काळ पाच भटक्या कुत्र्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती डाॅ. प्रकाश वाघ यांनी दिली.भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत शहरात वांरवार कारवाई सुरू असते.नियमानुसार भटकी कुत्री पकडून नसबंदी करून पुन्हा सोडून द्यावे लागते.मात्र असे अपघात घडू नयेत यासाठी जास्तीत जास्त खबरदारी घेऊन कारवाई करणार असल्याचे डाॅ. वाघ यांनी सांगितले.