ऐन थंडीत पुण्यात घामाच्या धारा! किमान तापमान तब्बल १८.४ अंश सेल्सिअसवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 08:48 AM2022-12-05T08:48:27+5:302022-12-05T08:49:18+5:30
रविवारी कमाल तापमान ३२.१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने पुणेकरांना रविवारी दुपारी घामाच्या धारांचा अनुभव घ्यावा लागला...
पुणे : दक्षिणेत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने त्याचा परिणाम होऊन राज्यातील थंडी गायब झाली आहे. दोन दिवसांपूर्वी थंडी जाणवणाऱ्या पुणे शहरात रविवारी किमान तापमान तब्बल १८.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. त्यामुळे रात्री चक्क फॅन लावण्याची वेळ आली. रविवारी कमाल तापमान ३२.१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने पुणेकरांना रविवारी दुपारी घामाच्या धारांचा अनुभव घ्यावा लागला.
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. विदर्भात काही ठिकाणी लक्षणीय वाढ झाली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये डिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी अर्थात दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी किमान तापमान १९.७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. त्यानंतर त्यात घट होत गेली होती. पंधरा दिवसांनी अर्थात २० डिसेंबर २०२१ रोजी सर्वांत कमी किमान तापमान ११.२ अंश सेल्सिअस झाले होते. १३ डिसेंबर २०२० रोजी किमान तापमान १८.७ अंशापर्यंत वाढले होते. सर्वांत कमी किमान तापमान दि. २२ डिसेंबर २०२० रोजी ८.१ अंश नोंदविले गेले होते.
गेल्या १० वर्षांत २ डिसेबर २०१३ रोजी सर्वाधिक किमान तापमान २१.५ अंश सेल्सिअस; तर सर्वांत कमी किमान तापमान २६ डिसेंबर २०१५ रोजी ६.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. पुढील पाच दिवस दिवसाचे आणि रात्री तापमान हे वाढते राहणार आहे. सोमवारी सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. ८ डिसेंबरपासून तीन दिवस आकाश पुन्हा ढगाळ राहण्याची शक्यता आहे.