कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पाच हजार डॉक्टरांचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:12 AM2021-04-23T04:12:03+5:302021-04-23T04:12:03+5:30
पुणे : कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ कमी पडत आहे. यावर मात करण्यासाठी आता एमबीबीएसची परीक्षा दिलेल्या डॉक्टरांचे मनुष्यबळ ...
पुणे : कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ कमी पडत आहे. यावर मात करण्यासाठी आता एमबीबीएसची परीक्षा दिलेल्या डॉक्टरांचे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील सुमारे ५,२३४ डॉक्टर उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला आहे. या विद्यार्थ्यांनी एमबीबीएसची परीक्षा दिली आहे. त्यांना इंटरशिप म्हणून हे काम देण्यात येणार असून, त्यासाठी ३० हजार रुपये मानधन देण्याचाही शासनाचा विचार आहे. त्याचबरोबर १२०० परिचारिकाही सेवेत येणार आहेत.
राज्य शासन व आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ओरिएंटेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून संबंधितांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळावरील ताण दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पाच हजारांवर डॉक्टर सेवेत आल्यावर त्यांचा ताण कमी होणार आहे. कोरोना काळात प्रशिक्षणार्थी डॉक्टर उपलब्ध व्हावेत, यासाठीच आरोग्य विज्ञान विद्यापीठाने एमबीबीएस अभ्यासक्रमाची परीक्षा पुढे ढकलली नाही. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून येत्या मे महिन्याच्या अखेरीस या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे पदवीधर डॉक्टर रुग्णसेवेसाठी उपलब्ध होतील, असे विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
--------------
आरोग्य विज्ञान विद्यापीठाने व राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने नुकतीच एमबीबीएसची परीक्षा दिलेल्या सुमारे ५ हजार २३४ विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन सुरू केले आहे. येत्या २४ एप्रिलपर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण केले जाईल. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यापीठाने आयोजित केलेल्या ओरिएंटेशन कार्यक्रमात या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे लवकरच सुमारे ५ हजार डॉक्टर कोविड रुग्णालयात काम करण्यासाठी उपलब्ध होतील.
- डॉ. नितीन करमळकर, प्रभारी कुलगुरू, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
विद्यार्थ्यांना एक वर्ष इंटरशिप बंधनकारक
एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना एक वर्ष इंटरशिप बंधनकारक असते. त्यानुसार राज्यातील ४० खासगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील ५ हजार २३४ विद्यार्थ्यांना इंटरशिप करावी लागणार आहे. या विद्यार्थ्यांना इंटरशिपसाठी १२ हजार रुपये मासिक मानधन दिले जाते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना ३० हजार रुपये मासिक मानधन देण्याचा शासनाचा विचार आहे, असेही आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.