'पुण्याची ताकद गिरीश बापट', साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं; चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 02:39 PM2023-03-29T14:39:54+5:302023-03-29T14:40:13+5:30
पुणे शहरातील राजकारणात गिरीश बापट यांची चांगली पकड होती
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज पुण्यात दुखःद निधन झाले. ते महाराष्ट्रातील भाजपच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक होते. चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार, राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अशा विविध पदावर काम केले. पुणे शहरातील राजकारणात बापट यांची चांगली पकड होती. ते शहरातील मध्यवर्ती विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या कसबा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. आज बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं आहे. बापट साहेबांच्या जाण्याने आमचा मार्गदर्शक हरपल्याचे दुःख व्यक्त करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापट यांनी तरुणपणी टेल्को कंपनीत काम केले होते. त्यावेळी त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी अनेकदा लढाही दिला होता. आणीबाणीनंतर गिरीश बापटांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. १९८३ मध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीत ते नगरसेवक झाले. सलग तीन वेळा बापट नगरसेवक म्हणून निवडून आले होते. विशेष म्हणजे याच काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.
पुणे पोरकं झालं.....! - चंद्रकांत पाटील
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त्व खासदार आदरणीय गिरीशजी बापट यांचं निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांसोबतच आम्हा भाजपाच्या परिवारावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या. बापट साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने 'पुण्याची ताकद गिरीश बापट' ही ओळख जनमानसात तयार केली होती. आज बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं आहे. बापट साहेबांच्या जाण्याने आमचा मार्गदर्शक हरपला आहे.