कसबा मतदारसंघात स्त्रीशक्ती प्रबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 06:26 PM2019-02-02T18:26:55+5:302019-02-02T18:37:42+5:30
पुणे जिल्हा निवडणुक शाखेने नुकतीच ३१ जानेवारी २०१९ पर्यंतची जिल्ह्याची मतदार यादी जाहीर केली.
पुणे : जिल्ह्यामध्ये कसबा मतदार संघात महिला मतदारांचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा देखील अधिक आहे. त्यामुळे केवळ याच मतदार संघामध्ये स्त्री मताला अधिक मान असल्याचे दिसून येत आहे. येथे दरहजारी पुरुष मतदारांमागे तब्बल १ हजार १७ स्त्री मतदार आहेत. जिल्ह्याची दरहजारी पुरुष मतदरांमागील स्त्री मतदारांची सरासरी केवळ ९१२ इतकी आहे.
पुणे जिल्हा निवडणुकशाखेने नुकतीच ३१ जानेवारी २०१९ पर्यंतची जिल्ह्याची मतदार यादी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात ३८ लाख ५१ हजार ४४५ पुरुष आणि ३५ लाख १२ हजार स्त्री मतदार आहेत. तर, भिन्न लिंगी मतदारांची संख्या १३९ इतकी आहे. एकूण जिल्ह्यात ७३ लाख ६३ हजार ८१२ मतदार आहेत. लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत शहरात पुरुष मतदारांची संख्या ३६ लाख ४४ हजार ६९५ अणि स्त्री मतदारांची संख्या ३२ लाख ८३ हजार ५६ इतकी होती. त्यावेळी दरहजारी पुरुषांमागे ९०१ स्त्री मतदार होत्या. त्या तुलनेत गेल्या पाच वर्षांत सरासरीत ९१२ महिला अशी वाढ झाली आहे.
कसबा मतदार संघात २०१४च्या निवडणुकीवेळी १ लाख ३७ हजार २४२ पुरुष आणि १ लाख ३७ हजार ८३९ स्त्री मतदार होत्या. त्यावेळी देखील पुरुषांच्या तुलनेत स्त्री मतदार अधिक होते. दरहजार पुरुषांमागे त्यावेळी १ हजार ४ स्त्री मतदार होत्या. या निवडणुकीत भोसरी मतदार संघात दरहजारी पुरुषांमागे सर्वात कमी ८२२ स्त्री मतदार आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत स्त्री मतदारांमध्ये सरासरीच्या तुलनेत १९ स्त्री मतदारांची वाढ झाली आहे. या निवडणुकीत भोसरीतील २लाख १९ हजार १४५ पुरुष आणि १ लाख ८० हजार ८१ स्त्रिया मतदान करतील.
जिल्ह्यात खडकवासला मतदार संघात स्त्री मतदारांची संख्या ९०० वरुन ८७९वर खाली घसरली आहे. या पुर्वीच्या लोकसभा निवडणुकीवेळी खडकवासल्यामध्ये २ लाख २५ हजार ४३१ पुरुष आणि २ लाख २ हजार ८१० स्त्री मतदार होते. त्यात पुरुष मतदारांच्या संख्येत २ लाख ४६ हजार ११७ पर्यंत वाढ झाली. तर स्त्री मतदारांची संख्या केवळ २ लाख १४ हजार ४५७ पर्यंत वाढली आहे.