साकुर्डेकरांचे हात बळकट करणार
By admin | Published: May 13, 2017 04:21 AM2017-05-13T04:21:29+5:302017-05-13T04:21:29+5:30
अभिनेता आमिर खान याच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत साकुर्डे येथील ग्रामस्थ उतरले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : अभिनेता आमिर खान याच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत साकुर्डे येथील ग्रामस्थ उतरले आहेत. गेल्या महिनाभरात येथे झालेले काम भविष्यात एक रोल मॉडेल ठरू शकते, एवढे प्रचंड काम उभे राहिले आहे. गाव पाणीदार करण्याची जिद्द बाळगणाऱ्या साकुर्डेकरांचे हात बळकट करण्यासाठी पुढील १५ दिवस जेजुरी औद्योगिक वसाहतीतील लघुद्योजकांची संघटना (जीमा) उतरत असल्याचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे यांनी म्हटले आहे.
बुधवारी सकाळी १० वाजता साकुर्डे येथे जेजुरी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे, उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे, कार्याध्यक्ष रवी जोशी, सचिव रमेश पाटील, पदाधिकारी अनंत देशमुख, राहुल कुंभारे, संतोष सस्ते आदी दोन जेसीबी मशीनसह दाखल झाले.
पुरंदर पाणी फाउंडेशनचे समन्वयक सुरेश सस्ते, पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती नीलेश जगताप, पुरंदर खरेदी-विक्री संघाचे संचालक संग्राम सस्ते, सरपंच तृप्ती जगताप, सदस्या सविता जगताप, नियोजक पोपट जगताप, शिवराज सस्ते पाणी फाउंडेशनचे रघुनाथ जगताप, आमिर पटेल, लालमुहंमद पठाण, अक्षय बनकर आदींनी त्यांचे स्वागत केले. या वेळी पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनी गायत्री तांदळे व श्वेता शिगवण यांनी पुण्याहून बसने येऊन उत्स्फूर्तपणे येथील ग्रामस्थांबरोबर श्रमदानास हजेरी लावली होती. त्यांचेही ग्रामस्थांनी स्वागत व अभिनंदन केले.
डॉ. रामदास कुटे यांच्या हस्ते जेसीबी मशीनच्या साह्याने कामाचा आरंभ करण्यात आला. डॉ. कुटे पुढे म्हणाले, की साकुर्डेकरांना मदतीचा हात देण्यासाठी आम्ही आलो आहोत. स्पर्धेत या गावाला यश मिळेल, अशी खात्री व्यक्त करून त्यांनी झालेले काम पाहता, भविष्यात हे गाव पाणीदार दिसणार आहे.