विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना मिळणार बळ : इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 09:36 PM2018-10-15T21:36:36+5:302018-10-15T21:42:00+5:30
‘इन्क्युबेशन सेंटर’मार्फत विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण अशा निवडक कल्पनांना बळ देऊन त्यांचे व्यवसाय व उद्योगांमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत केली जाणार आहे.
पुणे : विद्यार्थ्यांच्या डोक्यात अनेकदा नाविन्यपूर्ण कल्पना येतात. मात्र, अनेकदा त्या तशाच विरून जातात. पण आता विद्यार्थ्यांच्या या अभिनव कल्पनांना सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाकडून बळ दिले जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठात इन्क्युबेशन सेंटरची सुरूवात करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या ‘इन्क्युबेशन सेंटर’मार्फत नाविन्यपूर्ण अशा निवडक कल्पनांना बळ देऊन त्यांचे व्यवसाय व उद्योगांमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत केली जाणार आहे.
विद्यापीठाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांसह विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यापीठाशी विविध संशोधन व विकास प्रकल्पात सहभागी असलेल्या संस्था व कंपन्या, ग्रास रूट इनोवेटर्स यांना मध्ये सहभागी होता येणार आहे.
इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण अशा निवडक प्रस्तावांसाठी १८ महिने पायाभूत सुविधा, व्यवसाय उभारण्यासाठी लागणाऱ्या सेवा तसेच, मेंटॉरशीप उपलब्ध करून दिली जाणार आहे. यापैकी निवडक कल्पनांसाठी सुरुवातीचे भांडवलही उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी तंत्रज्ञान व सामाजिक विषयांशी संबंधित संकल्पनांचा विचार केला जाणार आहे.
इन्क्युबुेशन सेंटरचे उद्घाटन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, इक्युबेशन सेटरच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर उपस्थित होते. नाविण्यपूर्ण कल्पना मांडण्यासाठी एक पोर्टलही सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलव्दारे नाविन्यपूर्ण व्यावसायिक संकल्पना असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न विद्यापीठाकडून केला जाणार आहे. त्यासाठी विविध पाच गटांतून प्रस्ताव मागविले जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची तारीख १४ नोव्हेंबर २०१८ ही आहे. यानंतरही पुढच्या काळात नवे प्रस्ताव देण्याची संधी देण्यात येईल. यासाठी आलेले प्रस्ताव प्राथमिक समितीपुढे ठेवले जातील. त्यातील निवडक प्रस्ताव तज्ज्ञांच्या समितीपुढे मांडले जातील. उद्योगांना सध्या भेडसावणाऱ्या समस्यांची उत्तरे शोधणाऱ्या काही कल्पनांनाही यामध्ये स्थान दिले जाणार आहे. त्यामुळे उद्योगांना या विषयांशी संबंधित काही समस्या असल्यास इन्क्युबेशन सेंटरची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.