पुण्यातील पक्षी-प्राणी तपासणी प्रयोगशाळेवर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:10 AM2021-01-15T04:10:21+5:302021-01-15T04:10:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग वाढण्याच्या भीतीमुळे ठिकठिकाणांहून मृत पक्ष्यांचे नमुने येऊ लागल्याने पुण्यातील पक्षी-प्राणी तपासणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग वाढण्याच्या भीतीमुळे ठिकठिकाणांहून मृत पक्ष्यांचे नमुने येऊ लागल्याने पुण्यातील पक्षी-प्राणी तपासणी प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. अंतिम तपासणी करणाऱ्या भोपाळ येथील प्रयोगशाळेने नमुने घेणे थांबवल्याने पुण्यातील निष्कर्ष प्रलंबित राहत आहेत.
पुण्यातील प्रयोगशाळा एच-५ पर्यंतची तपासणी करणारी आहे. एन-१ ची तपासणी देशात फक्त भोपाळ येथील प्रयोगशाळेतच होते. त्यांच्याकडे देशातील वेगवेगळ्या राज्यातून नमुने येत असल्याने तपासणी यंत्रणेवर ताण येत आहे. त्यामुळे त्यांनी आता नमुने घेणे थांबवले आहे.
पुण्यात राज्यातील एकमेव प्रयोगशाळा आहे. त्यांच्याकडेही आता राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणांहून मृत पक्ष्यांचे नमुने येत आहेत. त्यांच्याकडे दोनच यंत्रे व चार तज्ज्ञ असल्याने त्यांच्यावरही आता ताण येतो आहे. तपासणीच्या प्रक्रियेविषयी माहिती घेतली असता मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन केले जात असल्याचे सांगण्यात आले. निष्कर्ष मिळण्यासाठी किमान दोन दिवस लागतात. यात विषाणूंच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्याने वारंवार निर्जंतुकीकरण करावे लागते.
बर्ड फ्लूची चर्चा आता देशात सर्वत्र असल्याने पक्षी किंवा प्राणी मृत झाले की, पशुसंवर्धन विभागाकडे त्वरित नमुने आणून देण्याच्या घटना वाढल्या आहेत. बुधवारी रात्री पुण्यातील प्रयोगशाळेत वेगवेगळ्या ठिकाणांहून २२ नमुने आले. त्यांची तपासणी प्रलंबित असल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले.
चौकट
“राज्यात फक्त पुण्यातच प्रयोगशाळा आहे. त्यात एच-५ ची तपासणी होते. एन-१ ची तपासणी करायची, तर ते नमुने आम्ही भोपाळला पाठवतो. पुण्यातही मनुष्यबळ कमी असल्याने एकाच वेळी जास्त नमुने तपासून होत नाहीत. तरीही आम्ही प्रयत्न करतो आहोत.”
डॉ. धनंजय परकाळे, अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन विभाग