पचनशक्तीवर पडणारा ताण रमा एकादशी दिवशी हलक्या फलाहाराने करा सुसह्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 04:12 PM2017-10-12T16:12:47+5:302017-10-12T16:26:53+5:30
यंदाची दीपावली चारच नव्हे तर रमा एकादशी रविवार १५ ते यमद्वितीया शनिवार २१ आॅक्टोबर भाऊबीजपर्यंत सात दिवस त्या त्या दिवसांचे सांस्कृतिक महत्त्व जाणून साजरी करावी, असे आवाहन पं. वसंतराव गाडगीळ यांनी केले.
पुणे : ज्यांना सवडशास्त्र नव्हे तर पंचांगानुसार प्राचीन धर्मशास्त्र पाळायचे असेल, त्यांच्यासाठी यंदाची दीपावली चारच नव्हे तर रमा एकादशी रविवार १५ ते यमद्वितीया शनिवार २१ आॅक्टोबर भाऊबीजपर्यंत सात दिवस त्या त्या दिवसांचे सांस्कृतिक महत्त्व जाणून साजरी करावी, असे आवाहन भारतीय संस्कृति, परंपरा व तत्त्वज्ञानाची संवर्धन व जतन करण्यासाठीच स्थापन झालेल्या एमआयटीच्या डॉ. विश्वनाथ कराड विश्वशांती विश्वविद्यालयाचे कुलाचार्य पं. वसंतराव गाडगीळ यांनी केले आहे.
पं. गाडगीळ यांनी सांगितले, की प्रत्येक महिन्यांत दोन आणि संपूर्ण वर्षात एकूण २४ एकादशी येतात. त्यापैकी दीपोत्सवाच्या आरंभाची आश्विन कृष्ण एकादशीच फक्त देवता श्रीलक्ष्मी हिचे नाव असणारी रमा एकादशी असते. यावर्षी रविवारी दीपावलीच्या स्वागतासाठी रमा-लक्ष्मीसमोर सात दिवसांसाठीचा अखंड तेवत राहणारी समई (नंदादीप) लावून दीपावली महोत्सव-सप्ताहाचा श्रीगणेशा करावा. या दिवशी शारीरिक स्वास्थ्यासाठी, पुढे भाऊबीजेपर्यंत फराळावर ताव मारायचा असल्यामुळे पचनशक्तीवर पडणारा ताण रमा एकादशी दिवशी हलक्या फलाहाराने सुसह्य करावा़
सोमवार दि.१६ आॅक्टोबरला गुरूद्वादशी व वसुबारस (गोवत्स द्वादशी) अशा सर्वच गोशाळा/गोठ्यातून दुग्धव्यावसायिकासाठी आणि घरोघरसुद्धा गोपूजनाचा दीपोत्सवाचाच दुसरा दिवस़ सायंकाळी पुण्यासारख्या अनेक शहरात सुध्दा घरोघर होते़ धनत्रयोदशीला मंगळवार दि.१७ ला सर्व डॉक्टर वैद्य औषधी व्यावसायिकांचे धन्वंतरी पूजन आणि यम दीपदान करावयाचा दिवस. नरक चतुर्दशी बुधवार दि. १८ हा चार दिवसांची दिवाळी साजर्या करणार्या सर्वांसाठीच. त्यातही नवविवाहित जावईबापूंसाठी दिवाळ सणाचा-पहाटे ब्राह्ममुहूर्त ४.३० ते चन्द्रोदय ५.०५ पर्यंत दिवाळीचे उटणे, सुगंधी तेल सर्वांगाला मर्दून मंगल अभ्यंगस्नानाचा महत्त्वाचा पवित्र दिवस. ज्यांच्या घरी या वर्षात घरातील कोणाच्याही मृत्यूमुळे दीपावली नाही, ज्यांच्या घरी देवासमोर पहाटे फराळ नेऊन ठेवावा आणि आपल्या घरी येऊन आपण फराळ करावा. हा सामाजिक बांधिलकीचा माणुसकीचा धर्म कोणीही विसरू नये, असे गाडगीळ यांनी सूचविले आहे.
दि. १९ गुरुवारी रात्री लक्ष्मीपूजन, शुक्रवार, दि.२० दिवाळी पाडवा पहाटे उद्योग व्यवसाय भरभराट शुभलाभासाठी सरस्वती पूजन (वहीपूजन), बलिप्रतिपदा आणि सातव्या दिवशी दि.२१ रोजी शनिवारी बहिण-भावाच्या चिरंतन प्रेमाचे/स्नेहाचे प्रतीक असलेल्या भाऊबीज ओवाळणीने दीपावली सप्ताहाची सांगता करावी.
दीपावली म्हणजेच दिवाळी हा आता केवळ धार्मिक कर्मकांडाचा सण राहिला नसून, सर्वसमावेशक अशा भारतीय संस्कृतीचे प्रतीक असणारा सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सव आहे, म्हणून ही सणांची सम्राज्ञी दिवाळी साजरी करतात, याचे भान सर्वांनी ठेवावे, असे आवाहन पं. गाडगीळ यांनी केले आहे.