ससूनच्या आॅक्सिजन यंत्रणेवर ताण, सुधारणा करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 02:56 PM2020-09-04T14:56:32+5:302020-09-04T14:56:47+5:30
जम्बो’च्या अक्षमतेमुळे लागणार विलंब
पुणे : ससून रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची आॅक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने यंत्रणेवर ताण येत आहे. या यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. सुमारे २०० रुग्ण जम्बो रुग्णालयात हलवून दोन टप्प्यांत हे काम केले जाणार होते. पण जम्बोच्या अकार्यक्षमतेमुळे जुन्या इमारतीतच रुग्ण हलवून हे काम पुर्ण करण्याचे नियोजन आहे.
ससूनच्या नवीन इमारतीमध्ये टप्प्याटप्याने व्हेंटिलेटरची संख्या १२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. सुरूवातीला केवळ ५० व्हेंटिलेटरचे नियोजन करण्यात आले होते. सध्या एकही व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही. तसेच सध्या पाच आयसीयु आणि ४१९ आॅक्सिजन बेड आहेत. त्यासाठी प्रत्येक बेडपर्यंत पाईपलाईनद्वारे आॅक्सिजन पुरवठा केला जातो. सर्व बेडवर रुग्ण असले तरी प्रत्येकाला आॅक्सिजनची गरज भासत नाही. गरजेनुसार रुग्णांना कमी-अधिक प्रमाणात पुरवठा होतो. मात्र व्हेंटिलेटरवरील रुग्णांची आॅक्सिजनची खुप अधिक आहे. रुग्णालयामध्ये १३ हजार किलो लिटर क्षमतेची आॅक्सिजन टँक आहे. किमान दिवसाआड तो टँक भरावा लागतो.
मागील पाच महिन्यांत आॅक्सिजनची मागणी टप्प्याटप्याने वाढत गेल्याने आता ही यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे. टँकच्या मुख्य पाईपलाईनची क्षमता वाढविणे, लिक्विड आॅक्सिजनचे गॅसमध्ये रुपांतर करण्यासाठी आवश्यक यंंत्रणा दुप्पट करणे, गॅस सिलिंडर वाढविणे, नवीन टँक उभारणे ही कामे केली जाणार आहेत. जुन्या इमारतीमध्ये एक-दोन दिवसांत १०० ते १२० बेड सज्ज होणार आहेत. तिथे नवीन इमारतीतील एका-एका मजल्यावरील आॅक्सिजनवरील रुग्ण टप्प्याटप्याने हलवून काम केले जाणार आहे. तिथे ६ हजार किलो लिटर आॅक्सिजन टँकचे काम पुर्ण करण्यात आले आहे.
-------------
ससूनची सद्यस्थिती (नवीन व जुनी इमारत)
एकुण खाटा - ५४७
रुग्ण - ५४७
आॅक्सिजनवरील - ४१९
आयसीयु - ५
व्हेंटिलेटरवर - १२३
----------------
आॅक्सिजनची मागणी वाढल्याने यंत्रणेची क्षमता वाढविली जाणार आहे. त्यासाठी जुन्या इमारतीत रुग्ण हलविले जातील. जम्बोमध्ये रुग्ण हलविले असते तर हे काम लवकर पुर्ण झाले असते. पण तेथील अपुºया सुविधांमुळे रुग्णांची कोणत्याही प्रकारची हेळसांड होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला.
- एस. चोकलिंगम, प्रशासकीय अधिकारी, ससुन रुग्णालय
-------------