गणेशोत्सवात दणदणाट करणाऱ्या DJ वर कडक कारवाई; ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ‘एनजीटी’ ची नियमावली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 03:14 PM2024-09-01T15:14:10+5:302024-09-01T15:15:04+5:30

डीजेचा कर्णकर्कश आणि दणदणाट करणारा आवाज काहींना सहन न झाल्याने जिवाला मुकावे लागल्याचेही निदर्शनास आले आहे

strict action against DJ making noise during pune ganeshotsav regulations of 'NGT' announced to prevent noise pollution | गणेशोत्सवात दणदणाट करणाऱ्या DJ वर कडक कारवाई; ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ‘एनजीटी’ ची नियमावली जाहीर

गणेशोत्सवात दणदणाट करणाऱ्या DJ वर कडक कारवाई; ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ‘एनजीटी’ ची नियमावली जाहीर

पुणे : गणेशोत्सवात काळातील दणदणाट आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनत आहे. डीजेचा आवाज आणि लेझर शाे यामुळे यापूर्वी अनेकांना कर्ण आणि दृष्टी दाेषास सामाेरे जावे लागले आहे. काहींना हा आवाज सहन न झाल्याने जिवाला मुकावे लागल्याचेही निदर्शनास आले आहे. ही बाब विचारात घेऊन ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने नवीन नियम घालून दिले आहेत. गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणाविषयी श्रवणतज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी केलेली याचिका निकाली काढताना एनजीटीने हे नियम घालून दिले असून, त्यांचे पालन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व पोलिसांवर सोपविली आहे. ‘एनजीटी’चे न्यायिक सदस्य दिनेशकुमार सिंग आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. विजय कुलकर्णी यांनी हा निकाल दिला आहे.

गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी श्रवणतज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी ॲड. मैत्रेय घोरपडे यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली होती. त्यात राज्य सरकार, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल, महापालिका आणि पुणेपोलिस यांना प्रतिवादी करण्यात आले होते. पुण्यात गणेशोत्सव काळात होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती.

काय आहेत नियम?

गणेश मंडळांच्या मांडवात व जवळच्या ठिकाणी आवाजाचे ‘रिअल-टाइम’ निरीक्षण करावे, मांडवात दोन ठिकाणी डिजिटल डिस्प्ले बोर्डांवर आवाजाची पातळी व मर्यादा नमूद असावी, त्यावर ध्वनिप्रदूषण आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा वैधानिक इशारा असावा, विसर्जन मिरवणुकीत प्रमुख चौकांमध्ये आवाजाचे रिअल टाइम निरीक्षण करावे, या डिस्प्ले बोर्डांचा खर्च प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावा, पोलिसांनी प्रदूषण नियंत्रण मंडळासह विचारविनिमय करून गणेश मंडळांना जास्तीत जास्त शंभर वॅट क्षमतेपर्यंत ध्वनी यंत्रणेला परवानगी देण्याचा विचार करावा, गणेश मंडळांनीही ध्वनियंत्रणेची परवानगी मागताना स्पीकर्सची संख्या व क्षमता नमूद करावी. मांडवाचे स्थान व आकारावर आवाजाच्या क्षमतेची मर्यादा शिथिल करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार ‘एमसीबी’शी चर्चा केल्यावर पोलिसांना असेल. विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळातील ढोल-ताशा-झांज पथकातील सदस्यांची संख्या तीसपेक्षा अधिक नसल्याची खातरजमा पोलिसांनी करावी. विसर्जन मिरवणुकीत टोल व डीजे वाजविण्यास मनाई असल्याची सूचना पोलिस विभाग देईल, तसेच त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. ध्वनि प्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियमावलीचे उल्लंघन झाल्यास पोलिस फौजदारी कायद्यानुसार कारवाई करतील. अनंत चतुर्दशीनंतर सात दिवसांच्या आत उत्सवात ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची नावे ‘एमपीसीबी’ दोन स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करेल, तसेच अशा प्रकरणांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. गणेशोत्सवापूर्वी ‘एमपीसीबी’ने या सूचना आणि ध्वनी प्रदूषणाच्या हानिकारक परिणामांबाबत व्यापक प्रसिद्धी करावी, अशा सूचनांचा त्यामध्ये समावेश आहे.

Web Title: strict action against DJ making noise during pune ganeshotsav regulations of 'NGT' announced to prevent noise pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.