आरोपीवर कडक कारवाई व्हावी; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटनेची महिला आयोगाकडून दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 03:12 PM2023-06-27T15:12:53+5:302023-06-27T15:13:50+5:30
घटनेचा सद्यस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या महिला आयोगाच्या सूचना
पुणे : दर्शना पवार हत्याप्रकरण ताजे असताना पुण्याच्या सदाशिव पेठेत धक्कादायक घटना घडली आहे. महाविद्यालयीन तरुणीवर पुण्यातील सदाशिव पेठ एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यावरून मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्मण झाला आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाकडून या घटनेची दखल घेण्यात आली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आरोपीवर कडक कारवाई होण्याची मागणी केली आहे.
मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सदाशिव पेठेतील पेरू गेट पोलीस चौकी पासून अवघ्या काही अंतरावर हा प्रकार घडला. प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. या घटनेनंतर तरुणाला जमावाने चांगलाच चोप दिला. आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
आरोपीवर कडक कारवाई व्हावी
संबंधित घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडितेवर रूग्णालयात उपचार सुरू असून सायंकाळपर्यंत घरी सोडण्यात येईल. पुणेपोलिस आयुक्त वैयक्तिक तपासात लक्ष देत असून, घटनेचा सद्यस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना आयोगाच्या वतीने दिल्या आहेत. आरोपीवर कडक कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करत आहोत. असे रुपाली चाकणकर यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.